‘अमुक झाले पाहिजे’, ‘हे काम शासनाचे/ महापालिकेचे आहे’, ‘ही समाजसेवा म्हणजे लष्कराच्या भाकऱ्या भाजणे आहे’, ‘कोणी सांगितलाय हा नसता उद्योग’ अशी वाक्ये आपल्या कानावर वरचेवर पडत असतात. शासन व महापालिका यांनी त्यांची कामे केली पाहिजेत, हे खरे असले तरी ते कामे करतील म्हणून आपण नुसत्या तक्रारी करीत बसणे योग्य नाही. नागरिक म्हणून आपले काही कर्तव्य आहे अशा भावनेतून काही जण न कंटाळता, प्रसंगी आपल्या खिशाला कातर लावून एक प्रकारे ‘जागल्या’ची भूमिका पार पाडतात. या वेळच्या ‘सेकंड इनिंग’मध्ये अशाच एका जागल्यांना आपण भेटणार आहोत. त्यांचे नाव महादेव गोविंद ऊर्फ भाऊ सावंत.

सावंत हे मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील आणि मालवण तालुक्यातील असरोंडे गावचे. त्यांच्या वडिलांना सामाजिक कामाची आवड होती. तोच वारसा भाऊंना मिळाला. भाऊंचा जन्म मुंबईचाच. त्यांचे शालेय शिक्षण भायखळा येथील महापालिका व लालबाग येथील सरस्वती हायस्कूल येथे झाले. बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना पुढे शिक्षण घेता आले नाही आणि मॅट्रिक झाल्यानंतर १९७३ मध्ये ते ‘फिल्म्स डिव्हिजन’मध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून नोकरीला लागले. पुढे मेहनत व जिद्दीने ते वरच्या पदापर्यंत पोहोचले. ३८ वर्षांच्या दीर्घ सेवेनंतर ते ‘फिल्म्स डिव्हिजन’मधून २०११ मध्ये ‘साहाय्यक संकलक’ (वर्ग २) या पदावरून निवृत्त झाले.

नोकरी सांभाळून त्यांचे सामाजिक काम सुरूच होते. निवृत्तीनंतर आज वयाच्या ६५ व्या वर्षीही त्यांचे काम सुरूच आहे. सार्वजनिक हिताचा प्रश्न हाती घेणे व तो तडीस लागेपर्यंत त्याचा पाठपुरावा करणे हे त्यांच्या कामाचे वैशिष्टय़. बृहन्मुंबई महापालिका, राज्य शासन किंवा संबंधित शासकीय यंत्रणांकडे निवेदनाच्या माध्यमातून आपल्या सूचना, तक्रारी मांडणे, त्यांचा चिकाटीने पाठपुरावा करणे, संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेणे, चर्चा करणे अशी सर्व कामे ते आनंदाने करतात. समस्येची तड लागली याचा आनंद त्यांच्यासाठी मोलाचा असतो.

भाऊ सावंत हे मुंबई मराठी पत्रकार संघाचे सहसदस्य आहेत. संघाला नुकतीच ७५ वर्षे पूर्ण झाली. पत्रकार संघाच्या बैठकीत पत्रकार संघावर ‘टपाल पाकीट’ प्रकाशित केले जावे, अशी सूचना केली होती. पत्रकार संघाचे अध्यक्ष व अन्य सहकाऱ्यांच्या मदतीने भाऊंनी त्याचा मुख्य पोस्ट मास्तर जनरल (मुंबई) यांच्याकडे पाठपुरावा केला व २१ जून २०१६ रोजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते मुंबईत त्याचे प्रकाशन झाले. या कार्यक्रमात महाजन यांच्या हस्ते भाऊंचा विशेष सत्कार करण्यात आला. संयुक्त महाराष्ट्राच्या इतिहासात मुंबईतील ‘हुतात्मा चौक’ परिसराला विशेष महत्त्व आहे. याच ठिकाणी १०६ जण हुतात्मे झाले. २१ नोव्हेंबर १९५५ या दिवशी संयुक्त महाराष्ट्राच्या समर्थनार्थ येथे जमलेल्या लोकांवर पहिल्यांदा गोळीबार झाला आणि त्यात १४ जण मृत्यू पावले. हा दिवस राज्य शासनाने ‘महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृतिदिन’ म्हणून साजरा करावा, अशी सूचना त्यांनी राज्य शासनाकडे केली होती. २१ नोव्हेंबर २००० पासून राज्य शासनातर्फे हा दिवस साजरा करण्यात येतो. ‘हुतात्मा चौक’ या नावाऐवजी त्याचे नामकरण ‘हुतात्मा स्मारक चौक’ करण्याची मागणी त्यांनी महापालिका प्रशासनाकडे केली असून अद्याप ती प्रलंबित आहे.

मराठी वृत्तपत्रसृष्टीचे आद्य जनक ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांची स्मृती जपण्यासाठी बृहन्मुंबई महापालिका मुख्यालय व मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या समोरील चौकाला ‘दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर चौक’ नाव देण्याची सूचना भाऊ यांनी केली होती. पत्रकार संघाच्या सहकार्याने भाऊंनी त्याचा पाठपुरावा केला. सूचना मंजूर झाली आणि १७ मे २००५ मध्ये तेव्हाचे उपमुख्यमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांच्या हस्ते चौकाचे नामकरणही झाले. भायखळा येथील जिजामाता उद्यानात जिजामाता व बाल शिवाजी यांचा पुतळा बसविणे, जिजामाता यांची पुण्यतिथी साजरी करणे आदीसाठीही त्यांनी १७ वर्षे पाठपुरावा केला. १७ जून १९९८ रोजी उद्यानात पुतळा बसविला गेला. या कार्यक्रमात दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते भाऊंचा सुवर्णपदक देऊन सत्कार करण्यात आला. ‘बेस्ट’ व ‘फिल्म्स डिव्हिजन’चे ‘बोधचिन्ह’ बनवून घेण्यासाठीही भाऊंचीच चिकाटी फळाला आली. बृहन्मुंबई महापालिकेच्या ‘द बॉम्बे सिव्हिक पत्रिका’ या मासिक पत्रिकेचे ‘बृहन्मुंबई महापालिका पत्रिका’ असे नामकरण व मासिकात पहिल्यांदा इंग्रजीऐवजी मराठीचा मजकूर प्राधान्याने द्यायला भाऊंचाच पाठपुरावा कारणीभूत ठरला. वृत्तपत्र लेखक म्हणूनही त्यांनी विविध तक्रारी, समस्यांचा वेध घेतला आहे.

पत्नी जयश्रीसह वीणा सावंत-दळवी ही विवाहित कन्या, विनायक हे जावई व कल्पेश हा मुलगा असा त्यांचा परिवार. सामाजिक बांधिलकी पार पाडणे आणि समाजऋण फेडणे हे आपल्या प्रत्येकाचेच कर्तव्य आहे. ज्याने त्याने आपल्या कुवतीनुसार यात खारीचा वाटा उचलावा असे त्यांचे आवर्जून सांगणे आहे.

भाऊ सावंत

९८६९२६८०९१

०२२-२३०२०३१०