रासपला निवडणूक आयोगाची मान्यता मिळण्यासाठी अधिक जागांवर लढण्याबरोबर पक्षाच्या चिन्हावर लढणे आवश्यक आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आमचे उमेदवार भाजपच्या कमळाच्या चिन्हावर लढणार नाहीत तर रासपच्या चिन्हावर लढतील, असे रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष व पशुपालन व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी पक्षाच्या मेळाव्यात जाहीर केले. तसेच अभिनेता संजय दत्त २५ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय समाज पक्षात (रासप) प्रवेश करणार असल्याचा दावा त्यांनी केला. जानकर यांना शुभेच्छा देणारी संजय दत्तची ध्वनिचित्रफिती या वेळी प्रसारित करण्यात आली.

राष्ट्रीय समाज पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त शिवाजी पार्कवर मेळावा घेत जानकर यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शक्तिप्रदर्शन केले. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आमदार राहुल कुल, भाजपचे आमदार प्रवीण दरेकर या वेळी उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीत आम्हाला एकही जागा सोडली नसली तरी युतीसोबत राहिलो. विधानसभा निवडणुकीसाठी  रासपला ५७ जागांची अपेक्षा आहे. शेजारच्या कर्नाटक, गुजरातमध्ये रासपला पक्ष म्हणून मान्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात रासपला पक्ष म्हणून निवडणूक आयोगाची मान्यता मिळावी यासाठी ५७ जागा भाजप-शिवसेना युतीने सोडाव्यात. दौंडची जागा आधीच रासपला सोडण्यात आलेली आहे, असे जानकर यांनी नमूद केले. धनगर समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय भाजप सरकारच घेईल. त्यामुळे आम्ही भाजपला साथ देत असल्याचेही जानकर म्हणाले.

रासपचे ९८ जिल्हा परिषद सदस्य आहेत. नगरपालिका, बाजार समितीवर पक्षाची माणसे आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपकडून रासपचा योग्य सन्मान राखला जाईल, असे आश्वासन पंकजा मुंडे यांनी दिले.