महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर महालक्ष्मी रेसकोर्ससमोरील उद्यानात राज्यपालांनी चक्क अनधिकृत शिल्पाचे अनावरण केल्याची बाब पुढे आल्याने खळबळ उडाली. या शिल्पाला परवानगी मिळवण्यासाठी पालिकेकडे अर्ज करण्यात आला होता, मात्र परवानगीची वाट न पाहताच या शिल्पाचे अनावरण केले गेल्याचा आरोप स्थानिक लोकप्रतिनिधींनी केला आहे.

महालक्ष्मी रेसकोर्ससमोरील उद्यानात शायना एनसी यांच्या ‘आय लव्ह मुंबई’ संस्थेकडून बैलाचे एक कलात्मक शिल्प उभे करण्यात आले. या शिल्पाचे अनावरण सोमवारी सकाळी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी शाहरुख खानची पत्नी गौरी खानही उपस्थित होती. राज्यपालांच्या कार्यक्रमाची कल्पना तसेच निमंत्रण स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच स्थानिक स्वराज्य संस्था यांना देणे राजशिष्टाचाराचा भाग असतो. मात्र हा कार्यक्रम खासगी संस्थेकडून करण्यात आल्याने या कार्यक्रमाची कल्पना महापालिकेला किंवा स्थानिक लोकप्रतिनिधींना देण्यात आली नव्हती. राज्यपालांच्या या कार्यक्रमाला पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे उपस्थित राहिल्या. मात्र राज्यपालांच्या हस्ते अनधिकृत शिल्पाचे अनावरण होत असल्याची बाब त्यांच्याही लक्षात आली नाही.

‘आय लव्ह मुंबई’चा हा कार्यक्रम आटोपला जात असताना तिथे शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका अरुंधती दुधवडकर व माजी नगरसेवक अरविंद दुधवडकर पोहोचले. या शिल्पाला पालिकेकडून परवानगीच मिळाली नसल्याची बाब त्यांनी पालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. या शिल्पासंदर्भात डी वॉर्डच्या साहाय्यक आयुक्तांकडे परवानगीसाठी अर्ज करण्यात आला होता. डी वॉर्डकडून हा प्रस्ताव पालिका आयुक्तांकडे पाठवण्यात आला. मात्र त्याला अजूनही परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे हे शिल्प अनधिकृत आहे, असे अरविंद दुधवडकर यांनी सांगितले. पालिकेच्या परवानगीची वाट न पाहता केलेल्या या कार्यक्रमाविषयी दुधवडकर महापौर व आयुक्तांना पत्र लिहिणार आहेत. डी वॉर्डचे साहाय्यक आयुक्त देवीदास क्षीरसागर यांना या कार्यक्रमाची माहिती नव्हती. राज्यपालांच्या हस्ते कार्यक्रम होऊनही त्याबद्दल स्थानिक लोकप्रतिनिधींना कल्पना देण्यात आली नाही व तुरळक लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आटोपला गेला, असेही दुधवडकर यांनी सांगितले.