मार्गदर्शन समितीची नेमकी भूमिका काय?
चिपळूण येथे होणाऱ्या साहित्य संमेलनातील राजकारण्यांचे वर्चस्व, व्यासपीठाच्या ‘बारशा’वरून सुरू झालेला वाद, निमंत्रण पत्रिकेवरील भगवान परशुराम व त्यांच्या परशूच्या चित्रावरून उठलेले वादळ आदींना संमेलनासाठी स्थापन करण्यात आलेली मार्गदर्शन समिती पर्यायाने अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ कारणीभूत असल्याचे महामंडळाशी संबंधित सूत्रांकडून सांगण्यात आले. या सर्व गोष्टी स्थानिक संयोजन समितीने ठरवल्या असल्याचे सांगून महामंडळाला आपली जबाबदारी झटकता येणार नसल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे.
साहित्य संमेलनातील सर्व कार्यक्रम, निमंत्रण पत्रिका आणि अन्य बाबींसाठी महामंडळाच्या घटनेनुसार ‘मार्गदर्शन समिती’ स्थापन करण्यात येत असते. संमेलनातील परिसंवादाचे विषय, सहभागी होणारे वक्ते स्थानिक संयोजन समितीबरोबर चर्चा करून मार्गदर्शक समितीच निश्चित करत असते. तसेच संमेलन कोणतेही वादविवाद न होता पार पाडण्यासाठीही समितीची भूमिका महत्वाची असते. म्हणजेच एक प्रकारे संपूर्ण संमेलन यशस्वी करण्याची जबाबदारी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे महामंडळाचीच असते.   
संमेलनातील ज्या बाबींवरून आता जे वाद निर्माण झाले आहेत ते विषय संयोजन समितीने मार्गदर्शन समितीपुढे आणले होते का, मार्गदर्शन समितीने त्यावर त्याचवेळी आक्षेप घेतले का, नसतील तर का नाही, की संयोजन समितीवर महामंडळाचा म्हणजेच मार्गदर्शन समितीचा अंकूश राहिलेला नाही, ठाकरे यांच्या नावावरून वाद निर्माण होऊ शकतो, हे लक्षात आले नाही की भावनेच्या भरात हा निर्णय घेण्यात आला,  असे अनेक प्रश्न यातून निर्माण होत आहेत. मार्गदर्शन समिती आणि स्थानिक संयोजन समिती या दोघानाही आपली जबाबदारी एकमेकांवर ढकलता येणार नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे. या संदर्भात महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांची भूमिका कळू शकली नाही.