02 March 2021

News Flash

मुंबईत रंगणार महामुंबई कबड्डी लीगचा थरार!

१५ ते २१ जानेवारी दरम्यान रंगणार महामुकबला

प्रो कब्बडीमुळे कबड्डी या खेळाला ग्लॅमर प्राप्त झाले. याच प्रो कबड्डीत महाराष्ट्राच्या खेळाडूंचे नावही अभिमानाने घेतले जावे, प्रो कबड्डीला राज्यातून चांगले खेळाडू मिळावेत म्हणून जानेवारी महिन्यात महामुंबई कबड्डी लीगचा थरार रंगणार आहे. १५ ते २१ जानेवारीच्या दरम्यान अभिनव कला क्रीडा अकादमी आणि ओएज मीडियाच्या माध्यमातून कांदिवलीच्या चारकोपमधल्या विशाल सह्याद्री क्रीडा नगरीत कबड्डीचे सामने रंगणार आहेत. महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना आणि मुंबई उपनगर कबड्डी संघटनेच्या वतीने या दिमाखदार कबड्डीचा आवाज घुमणार आहे.

देशात कबड्डी कोणत्या राज्यात खेळली जाते? याचे उत्तर महाराष्ट्र आहे. मात्र संघात किंवा प्रो कबड्डीत सर्वाधिक खेळाडू कुणाचे खेळतात ? याचे उत्तर निश्चितच महाराष्ट्र नाही. राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचे खेळाडू नेमके का मागे पडतात? की त्यांना न्याय मिळत नाही ? हल्ली असे प्रश्न वारंवार विचारले जातात. याचे उत्तरही शोधावयाचे आणि खेळाडूंना आपला दर्जा सिद्ध करण्याची संधी द्यावयाची असा दुहेरी उद्देश महामुंबई कबड्डीच्या आयोजनातून साध्य करण्याचा आयोजकांचा मानस आहे.

आमच्या खेळाडूंना मॅटवरील तंत्र समजून घेऊन ते विकसित करणे या स्पर्धेचा आणखीन एक महत्त्वपूर्ण उद्देश आहे. महाराष्ट्रातील कबड्डीचा तांत्रिक पाया पक्का व्हावा यासाठी आम्ही हा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत, अशी भूमिका अभिनव कला क्रीडा अकादमीचे सर्वेसर्वा अंकुश मोरे यांनी मांडली. महामुंबई कबड्डी लीगच्या बोधचिन्हाचे औपचारिक उद्घाटन करताना स्पर्धेच्या सहा संघाच्या कर्णधारांचीही ओळख करून देण्यात आली.

१२०० खेळाडूंमधून संघांची निवड
प्रो कबड्डी लीगच्या धर्तीवर खेळविल्या जाणाऱया महामुंबई कबड्डीच्या सहा संघांची निवडही १२०० खेळाडूंच्या चाचणी स्पर्धेतून केली गेली. या चाचणीसाठी मुंबई, उपनगर, ठाणे, नवी मुंबईतून खेळाडू आले होते. त्यातून १०० खेळाडूंची निवड करण्यात आली असून आता त्यातूनच १२ खेळाडूंचे सहा संघ तयार केले जातील आणि उर्वरित खेळाडूंना राखीव ठेवले जाईल. प्रत्येक संघात ९ स्थानिक आणि ३ अन्य जिल्हयातील खेळाडूंची निवड करता येईल.

प्रो कबड्डीप्रमाणे महामुंबई कबड्डीतही संघाचे मालक असतील. तेच खेळाडूंचा सर्व खर्च उचलतील. या स्पर्धेच्या तयारीसाठी ७ दिवसांचे सराव शिबीरही आयोजित केले जाणार असून या शिबीरात खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी अनेक कबड्डी दिग्गजांना आमंत्रित करण्यात आले आहे. ही स्पर्धा साखळी आणि बाद फेरीत खेळली जाणार असून एकूण १७ सामने खेळले जातील. गटात अव्वल राहणाऱया पहिल्या दोन संघांमध्ये महामुंबई कबड्डी लीगचा अंतिम सामना खेळला जाईल तर तिसऱया क्रमांकासाठी गटातील तिसऱया आणि चौथ्या क्रमांकाच्या संघांमध्ये झुंज रंगेल.

ग्लॅमरस स्पर्धा

महामुंबई कबड्डी स्पर्धेलाही ग्लॅमरस लुक दिला जाणार आहे. रंगीबेरंगी दिव्यांचा झगमगाट,अॅक्शनपॅक्ड मनोरंजनासह या स्पर्धेतील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी प्रो कबड्डीचे स्टारही हजेरी लावणार आहेत. एवढेच नव्हे तर प्रो कबड्डीच्या प्रशिक्षकांनाही या स्पर्धेच्या निमित्ताने निमंत्रित केले जाणार असल्याची माहिती मोरे यांनी दिली. आगामी प्रो कबड्डीचा करोडपती स्टार या स्पर्धेतून मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कबड्डीचा थरार याची देही अनुभवता यावा म्हणून तीन हजार प्रेक्षक क्षमतेची भव्य गॅलरीही उभारली जाणार आहे. विशेष म्हणजे या लीगला प्रो कबड्डी स्टार रोहित कुमार आणि अभिनेते सुनील बर्वे हे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून लाभले आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2018 2:33 pm

Web Title: mahamumbai kabaddi league will be play in mumbai
Next Stories
1 १८४ गृहनिर्माण संस्था गोत्यात!
2 उपाहारगृहांमध्ये कर्मचाऱ्यांच्या वास्तव्यास मज्जाव
3 बेस्टच्या २८६ बसचे दोन दिवसांत नुकसान
Just Now!
X