लॉकडाउनमध्ये मुंबईकरांना थोडासा दिलासा देणारी बातमी आहे. घरगुती गॅसनंतर CNG, PNG गॅसच्या किंमती कमी झाल्या आहेत. केंद्र सरकारच्या आदेशानंतर महानगर गॅस लिमिटेड (MGL) नं मुंबई आणि उपनगरात सीएनजीच्या किंमतीत प्रतिकिलो दोन रूपयांनी कपात केली आहे. तर पीएनजीच्या दरात SCMनुसार एक रूपयांनी घट करण्यात आली आहे. आज, शनिवारी मध्यरात्रीपासून नवीन दर लागू होणार आहेत.

नवीन दरांनुसार सीएनजी प्रतिकिलो 47.95 रूपये मिळणार आहे. तर पीएनजी SCM (Slab 1) नुसार २९.६० रूपयांना मिळेल. आणि SCM (Slab 2)नुसार ३५.२० रूपयांना मिळणार आहे. देशांमध्ये करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असून लोकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अशांमध्येच सीएनजी आणि पीएनजीच्या किंमती कमी झाल्यामुळे लोकांना दिलासा मिळाला आहे. देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउन घेण्यात आला आहे.

दरम्यान, एक एप्रिलपासून विनाअनुदानित १४.२ किलोचा एलपीजी सिलेंडर दिल्लीमध्ये ६१.५ रुपयांनी स्वस्त झाला आहे. आधी या सिलेंडरची किंमत ८०५.५० रुपये होती, जी आता ७४४ रुपये झाली आहे. मुंबई येथे ७१४.५० रुपये आणि चेन्नईमध्ये ७६१.५० रुपये झाली आहे. याशिवाय कंपन्यांनी १९ किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत देखील कमी केली आहे. १९ किलोचा घरगुती गॅस सिलेंडर ९६ रुपयांनी स्वस्त झाला आहे. मुंबईमध्ये १२३४.५० रुपये झाली आहे.