जमिनींचे व्यवहार, आर्थिक वसुलीची कामे करून देण्याचे आमीष

महानंद डेअरीचा महाव्यवस्थापक आणि त्याच्या टोळीने पोलीस अधिकाऱ्यांसह सर्वसामान्यांनाही आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. हॉटेल सहारा स्टार येथील धाडीत गुन्हे शाखेने हिरमुखे व टोळीसह अन्य तिघांना ताब्यात घेतले होते, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळते. त्यात अकोल्यातील शेतकरी, सामाजिक संस्थेचा विश्वस्ताचा समावेश होता. आपली अडली नडली कामे करून घेण्यासाठी ते हिरमुखेच्या टोळीतील रवींद्रसिंग यादवकडे आले होते.

सोलापूर शहरचे पोलीस उपायुक्त नामदेव चव्हाण यांच्या तक्रारीवरून गुन्हे शाखेने ३१ मे रोजी सहारा स्टार हॉटेलमध्ये धाड घालून हिरमुखे, रवींद्रसिंग, किशोर माळी, विशाल ओंेबळे यांना बेडय़ा ठोकल्या. हॉटेलमधून तब्बल ५ कोटींचे दोन धनादेश (स्वाक्षरी केलेले, नावाचा रकाना मोकळा असलेले), ४० लाखांचा धनादेश, ६. ७० लाखांची रोकड आणि आक्षेपार्ह कागदपत्रे सापडली. पाच कोटींचा धनादेश या टोळीला कोणी दिला याबाबत सध्या गुन्हे शाखेकडून चौघांची कसून चौकशी सुरू असल्याचे समजते.

पोलिसांनी धाड घातली तेव्हा रवींद्रसिंगने सेन्सॉर बोर्डाचा सभासद असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला होता. प्रत्यक्षात तो बारावी पास  असल्याची माहिती चौकशीतून समोर आली. तो मुळचा दिल्लीचा असून तेथील राजकीय पुढाऱ्यांसह व वरिष्ठ शासयकीय अधिकाऱ्यांच्या भेटी घ्यायच्या, त्यांचे व्हिजिटिंग कार्ड घ्यायचा. तेच दाखवून आपली ओळख वपर्यंत आहे हे भासवून समोर आलेल्या प्रत्येकाला आकर्षित करायचा. धाडीवेळी ताब्यात घेण्यात आलेल्या तिघांना रवींद्रसिंगने केंद्रीय गृहमंत्रालयात सल्लागार असल्याची थाप मारली होती. तिघांपैकी एक गृहस्थ मूळचा गुजरातचा असून त्याची बोरिवली व विरार येथे जमीन आहे. ती विकण्यासाठी ग्राहक पाहून देतो, फायदा करून देतो, असे आमीष रवींद्रसिंगने दाखवले होते. व्यक्तिमत्त्व, बोलण्या-वागण्याचा अंदाज, पंचतारांकित हॉटेलमध्ये घडलेल्या भेटीगाठी यामुळे रवींद्रसिंगवर त्याचा विश्वास बसला. स्वत:च्या कामासोबत त्याने अकोल्यातील शेतकरी आणि एका सामाजिक संस्थेच्या विश्वस्ताची भेट रवींद्रसिंगसोबत घालून दिली होती. शेतकऱ्याला अकोल्यातील जमीन स्वत:च्या नावे करून हवी होती. तर विश्वस्ताने स्वत:च्या सामाजिक संस्थेचा दहा कोटींचा व्यवहार रवींद्रसिंगला हवा होता. अडकलेले पैसे काढून देण्याची विनंती त्याने केली होती. कारवाईत सापडलेले धनादेश याच व्यवहाराशी संबंधित असावेत, असा अंदाज आहे. शहानिशा करण्यासाठी या तिघांकडेही पोलीस कसून चौकशी करत आहेत.

त्याअधिकाऱ्यांची चौकशी होणार

विद्यासागर हिरमुखे व त्याच्या साथीदारांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याची चौकशी होणार आहे. गुन्हे शाखेकडून त्यासाठीची व्यूहरचना आखली जाते आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार या चौघांच्या संपर्कात असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. संपर्कात आल्यानंतर अधिकाऱ्याने या टोळीच्या माध्यमातून बदली करून घेतली का, आर्थिक व्यवहार केले का यासोबत फसवणूक घडली का हे तपासले जाणार आहे, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

कनिष्ठ अधिकाऱ्यांना सहानुभूती

‘लोकसत्ता’ला मिळालेल्या माहितीनुसार हिरमुखेने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी मध्यस्थी करताना पोलीस निरीक्षक ते शिपाई पदापर्यंतच्या काहींची फुकटात बदली करून दिली. त्यामुळे कनिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये हिरमुखेबद्दल सहानुभूती आहे.