महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ अर्थात महानंदच्या संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी ६२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असले तरी उमेदवारी अर्ज मात्र तब्बल ६७ दाखल झाल्याने ही निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
आजवर राष्ट्रवादी आणि काँग्रेसची मक्तेदारी असलेल्या महानंदवर काही महिन्यांपूर्वीच सरकारने कारवाई करून संचालक मंडळ बरखास्त केले होते. विविध प्रकारच्या घोटाळ्यांचा ठपका ठेवून दुग्धविकासमंत्री एकनाथ खडसे यांनी महानंदच्या संचालक मंडळावर कारवाई करताना गुन्हे दाखल करण्याचेही आदेश दिले आहेत. एवढेच नव्हे तर भ्रष्टाचाराचा ठपका ठेवून काही संचालकांना निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्यात आले असून दहा जिल्हा आणि तालुका सहकारी दूध संघांवर अपात्रतेची कारवाई करण्यात आल्याने या संघाच्या सभासदांनाही निवडणूक लढविण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे केवळ ६२ संघांनाच मतदानाचा हक्क प्राप्त झाला आहे.