महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी मंगळवारी दुपारी भगवानगडावर जाऊन संत भगवानबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. या वेळी त्यांनी भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींची भेट टाळली. त्यामुळे नामदेव शास्त्री व पंकजा मुंडे यांच्यातील वाद इतक्यात शमणार नसल्याचे यावरून दिसून येते. दरम्यान पंकजा मुंडे या भगवानबाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी आत गेल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी पोलिसांवर किरकोळ दगडफेक केली. यात दोन पोलीस जखमी झाल्याचे सांगण्यात येते. या वेळी सुरक्षेच्या कारणास्तव भगवानगडावर सर्वसामान्य लोकांसाठी दर्शन बंद करण्यात आले होते. भगवानगडावर असे पहिल्यांदाच घडल्याचे सांगण्यात आले.
भगवानबाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी पंकजा मुंडे या हेलिकॉप्टरने भगवानगडाच्या पायथ्याशी आल्या. त्या येण्यापूर्वी खासदार प्रीतम मुंडे या रॅलीसह पायथ्यापाशी आल्या होत्या. पायथ्यापासून एका रथात पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, कृषी मंत्री सदाभाऊ खोत, अमित पालवे हे भगवानगडाकडे मार्गस्थ झाले. या वेळी समर्थकांची प्रचंड गर्दी झाली होती. पंकजा मुंडे यांना सातत्याने कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन करावे लागत होते. गडाजवळ रथ येताच पोलिसांनी पंकजा मुंडे यांना चालत गडामध्ये जाण्याचे आवाहन केले. परंतु समर्थकांनी रथ थेट गडामध्ये नेण्याचा आग्रह केला. कार्यकर्त्यांचा रोष पाहून पोलिसांनी रथ गडामध्ये नेण्यास परवानगी दिली. मात्र पंकजा मुंडे या दर्शनासाठी आत जाताच कार्यकर्त्यांनी बाहेर किरकोळ दगडफेक केली. यात दोन पोलीस जखमी झाले. या मेळाव्याला वादाची किनार पाहता पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला.
दरम्यान, मंगळवारी सकाळी भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांना भगवानगडावर दर्शनासाठी येण्याचे निमंत्रण दिले. पंकजा यांनी गडावर यावे व माहेरचे दोन घास खाऊन जावे असे सांगत भोजनाचेही त्यांनी निमंत्रण दिले. तसेच जिल्हा प्रशासनाने भगवानगडाच्या पायथ्याशी पंकजा मुंडे यांना सभा घेण्यास परवानगी दिली आहे. याचे स्वागतही नामदेव शास्त्री यांनी केले. गडावरील सर्व धार्मिक कार्यक्रम परंपरेने होतील असे सांगत गडावर कुठलेही गालबोट लागणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली.
जिल्हा प्रशासनाने सोमवारी पंकजा मुंडे यांना भगवानगडावर सभा घेण्यास परवानगी नाकारली होती. प्रशासनाने मुंडे यांना भगवान गडाच्या पायथ्याशी गेट क्रमांक २२ जवळ सभा घेण्यास परवानगी दिली होती. याचा दाखला देत नामदेव शास्त्री यांनी हा तोडगा आपण ११ महिन्यांपूर्वीच पंकजा यांना सुचवला होता असा दावा केला. अखेर माझे मत सर्वांना उशिरा का होईना पटल्याचे त्यांनी या वेळी म्हटले.
भगवानगड हे धार्मिक अधिष्ठान आहे. त्यामुळे येथे राजकारणाला वाव नाही. मी येथे येणाऱ्या भाविकांना शांततेचे आवाहन करतो. आम्ही येथे कायदा व सुव्यवस्था सांभाळू अशी ग्वाही त्यांनी दिली. पंकजाने गडावर यावे. मी तिचे सदैव स्वागत करतो. भगवानगड हे राजकीय नव्हे धार्मिक अधिष्ठान आहे. त्यामुळे सर्वांनीच याचा आदर करावा. वारकरी सांप्रदाय हा सर्वांसाठी अजातशत्रू आहे. पंकजाने गडावर येऊन दर्शन घ्यावे आणि माहेरचे दोन घास खाऊन जावेत. मी तिचे स्वागत करतो असेही त्यांनी या वेळी म्हटले.