|| प्रसाद रावकर

मुंबई : भविष्यात सर्वसामान्य नागरिकांना करोनाची चाचणीची सुविधा सहज उपलब्ध व्हावी या दृष्टीने पालिका प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून प्रत्येक विभाग कार्यालयाच्या हद्दीतील पालिकेच्या दवाखान्यांमध्ये विनाशुल्क करोना चाचणी करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात येणार असून प्रशासन पातळीवर त्याची जुळवाजुळव करण्यात येत आहे.

करोनाबाधित रुग्णांचा शोध घेऊन संसर्गावर नियंत्रण मिळविता यावे यासाठी मोठ्या प्रमाणावर करोना चाचण्या करण्याचे आदेश इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत. त्यानुसार २४ प्रशासकीय विभाग कार्यालयांच्या हद्दीत करोना चाचण्या करण्यात येत आहेत. मात्र अनेक नागरिक लक्षणे जाणवू लागली तरीही चाचण्या करण्यास पुढे येत नाहीत. त्यामुळे चाचण्यांचे नेमून दिलेले उद्दिष्ट गाठणे शक्य होत नाही, असे काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

गणेशोत्सवानंतर करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली होती; परंतु काही दिवसांपासून नव्या बाधित रुग्णांचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. गणेशोत्सवाप्रमाणेच दिवाळीनिमित्त बाजारपेठांमध्ये गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे करोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ही बाब लक्षात घेत भविष्यात सर्वसामान्य नागरिकांना करोनाच्या चाचणीची सुविधा सहज उपलब्ध व्हावी या दृष्टीने उपाययोजना करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. मुंबईमध्ये ठिकठिकाणी पालिकेचे १७५ दवाखाने आहेत. यापैकी काही दवाखान्यांमध्ये विनाशुल्क करोना चाचणीची सुविधा उपलब्ध करण्याचा पालिकेचा मानस आहे. प्रत्येक विभाग कार्यालयाच्या हद्दीतील साधारण पाच दवाखान्यांमध्ये करोना चाचणी करता येईल अशी व्यवस्था करण्यात येणार आहे, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

सर्वसामान्य नागरिकांना करोना चाचणी करता यावी यासाठी पालिकेच्या दवाखान्यांमध्ये ही सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. दवाखान्यात ठरावीक वेळेत या चाचण्या करण्यात येतील. – सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त