|| प्रसाद रावकर

चूक लक्षात येताच भोजन पुरवठादारासह कॅटिरग कंपनीला दंड : – पालिकेच्या ‘जी-उत्तर’ विभागातील अधिकारी-कर्मचारी दुपारी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकदा वापरण्याजोग्या प्लास्टिकच्या वस्तूंवर बंदी घालण्याची घोषणा केलेली असतानाही पालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांनी बंदीयोग्य प्लास्टिकच्या थाळीतच दुपारच्या भोजनाचा आस्वाद घेतल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

ही बाब लक्षात आल्यानंतर पालिकेने प्लास्टिकच्या थाळीत जेवण पुरविणाऱ्या दोन पुरवठादारांवर अनुक्रमे पाच हजार रुपये आणि १० हजार रुपये दंड ठोठावला आहे. त्याचबरोबर कॅटरिंग कंपनीलाही २५ हजार रुपये दंड करण्यात आला आहे. या प्रकरणी तिघांवर एकूण ४० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी मोठय़ा संख्येने पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. विधानसभा निवडणुकीच्या गुरुवारी पार पडलेल्या मतमोजणीच्या कामात ही सर्व मंडळी व्यस्त होती. तर दिवाळीनिमित्त पालिकेच्या विविध कार्यालयांमध्ये शुक्रवारी छोटेखानी स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. काही कार्यालयांमध्ये वाद्यवृंदाचा, तर काही विभागांमध्ये कार्मचाऱ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचबरोबर सर्व कर्मचाऱ्यांसाठी दुपारी भोजनाची  व्यवस्थाही करण्यात आली होती.

‘जी-उत्तर’ विभागातील स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमासाठी भोजनाचा पुरवठा करण्याची जबाबदारी याच परिसरातील एका नामांकित बेकरीवर सोपविण्यात आली होती. दुपारी साग्रसंगीत भोजनाचा आस्वाद सर्वानी घेतला. मात्र बंदी असलेल्या प्लास्टिकच्या थाळ्यांमध्ये भोजनाचा पुरवठा करण्यात आल्याचे काही अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. बंदीयोग्य प्लास्टिक बाळगणारे बाजारपेठांमधील दुकानदार, फेरीवाले आदींवर पालिकेकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. असे असताना पालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांनीच बंदीयोग्य प्लास्टिकच्या थाळीत भोजनाचा आस्वाद घेतला. यावरून कर्मचाऱ्यांमध्येही गोंधळ उडाला. मात्र ही बाब लक्षात येताच प्लास्टिकच्या थाळीत भोजनाचा पुरवठा करणाऱ्यासह कॅटरिंग कंपनीला दंड ठोठावण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले.

अनाथाश्रमाला भेट

या कार्यक्रमाच्या निमित्ताने विभाग कार्यालयातील विविध विभागांमध्ये रोषणाई करण्यात आली होती. ‘जी-उत्तर’ विभाग कार्यालयातून गेल्या वर्षभरात निवृत्त झालेल्या २५ कर्मचाऱ्यांना कुटुंबासह या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते. ‘जी-उत्तर’ विविध विभागांसाठी ‘स्वच्छ विभाग’ स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले होते. वाद्यवृंदाचा कार्यक्रम आयोजित करण्याऐवजी ‘जी-उत्तर’मधील निवडक अधिकारी-कर्मचाऱ्यांनी माटुंगा येथील श्रद्धानंद आश्रमाला भेट दिली व अनाथाश्रमातील मुलांबरोबर काही वेळ व्यतीत करून, त्यांना भेटवस्तू देऊन अधिकारी-कर्मचारी विभाग कार्यालयात परतले.