04 August 2020

News Flash

राज्याच्या ‘आरोग्य भवना’त ३५ जण करोनाबाधित!

५२५ पैकी ७० कर्मचारीच कामावर

संदीप आचार्य 
मुंबई: संपूर्ण महाराष्ट्राच्या आरोग्याचा कारभार ज्या सेंट जॉर्ज रुग्णालयाच्या आवारात असलेल्या आरोग्य भवनातून चालतो, तेथील सुमारे ३५ कर्मचारी करोनाबाधित झाले आहेत. आठ मजली इमारतीत जवळपास प्रत्येक मजल्यावरील काही कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याचे आरोग्य विभागातील सूत्रांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी टर्मिनसलगत असलेल्या सेंट जॉर्ज रुग्णालयाच्या आवारात २००७ साली राज्याच्या आरोग्याचा कारभार चालविण्यासाठी आठ मजली इमारत बांधण्यात आली. आरोग्य आयुक्त, आरोग्य संचालक, सहसंचालक, उपसंचालक अशा महत्वाच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयापासून प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत तसेच आरोग्याच्या विविध योजनांचे कामकाज आरोग्य भवनातून चालतो. करोनाची सुरुवात होताच पुणे येथील दुसऱ्यांना आरोग्य संचलनालयातून करोना उपचार व साथीच्या आजारांचे नियंत्रणाचे कामकाज चालविण्यास सुरुवात झाली. यासाठी मुंबईतील आरोग्य भवनातील काही अधिकाऱ्यांना पुणे येथे पाठविण्यात आले असले तरी मुंबईतील आरोग्य भवनात जवळपास ५२५ कर्मचारी व डॉक्टर तैनात होते. मात्र लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून बहुतेक कर्मचारी घरीच होते.

५२५ कर्मचाऱ्यांमध्ये ‘राष्ट्रीय आरोग्य अभियानां’तर्गत ३०० कर्मचारी व डॉक्टर तर आरोग्य विभागाचे २२५ डॉक्टर व कर्मचारी काम करतात. यातील सुमारे ३५ जणांना करोनाची लागण झाली असून ५२५ कर्मचार्यांपैकी सध्या केवळ ७० च्या आसपास कर्मचारीच कामावर येत असून यात आरोग्य आयुक्त डॉ. अनुपकुमार व आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे यांच्यासह २५ डॉक्टरांचा समावेश आहे. करोनाच्या गेल्या तीन महिन्यात यातील एकाही डॉक्टरांनी जवळपास एकही दिवस सुट्टी घेतली नाही मात्र लिपिकांसह बहुतेक अन्य कर्मचारी वर्ग मात्र पहिल्या दिवसापासून कामावर आला नव्हता. हे सर्व कर्मचारी अत्यावश्यक सेवेअंतर्गत येत असतानाही पहिल्या महिन्यात पंचवीस ते तीस कर्मचारीच कामावर यायचे. परिणामी दांडीबहाद्दर कर्मचार्यांनी कामावर हजर व्हावे यासाठी नोटीसा बजावण्यात आल्या. याचा परिणाम म्हणून काही कर्मचारी कामावर हजर झाले तर अनेकांनी आपण गावाला असल्याने येऊ शकत नसल्याचे कारण पुढे केले.

नियमानुसार मुख्यालय सोडताना संबंधित अधिकाऱ्यांची परवानगी घेणे आवश्यक असतानाही बहुतेकांनी तशी परवानगी घेतली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान येथील जवळपास प्रत्येक मजल्यावरील चारपाच जणांना करोनाची बाधा झाल्यानंतर आरोग्याचा कारभार चालू राहाण्यासाठी रोटेशननुसार कर्मचाऱ्यांना कामावर बोलाविण्यात येत आहे. याबाबत आरोग्य आयुक्त डॉ. अनुपकुमार यांना विचारले असता “अनेक कर्मचारी करोनाबाधित झाल्याचे मान्य केले मात्र नेमक्या किती कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली ते स्पष्ट केले नाही. तसेच सुरुवातीच्या काळात दांडीबहाद्दर कर्मचार्यांना नोटीसा दिल्याचे सांगितले. मात्र करोनाची परिस्थिती लक्षात घेऊन एक दिवसाआड कर्मचाऱ्यांना कामावर बोलाविण्यात येत असल्याचे सांगितले. प्रत्येक विभागप्रमुखासाठी दोनतीन कर्मचारी तसेच अत्यावश्यक कर्मचाऱ्यांनाच सध्या बोलविण्यात येत असून रोज किमान ७० कर्मचारी कामावर येतात” असे डॉ. अनुपकुमार यांनी सांगितले.

आरोग्य भवनातून न्यालयातील खटल्यांना उत्तरे तयार करून देणे, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गतचे कामकाज तसेच विविध आरोग्य सेवांच्या कामांचा आढावा घेणे व कामांना गती देण्यासाठी उपस्थित कर्मचार्यांना रोज रात्री उशिरापर्यंत थांबून काम करावे लागत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2020 6:43 pm

Web Title: maharashtra aarogya bhavan 35 staff member corona positive scj 81
टॅग Coronavirus
Next Stories
1 “लालबागच्या राजाने जनतेसाठी नेहमीच आदर्श ठेवला असून या निर्णयाने…”; मुख्यमंत्र्यांकडून मंडाळाचं कौतुक
2 मुंबई पोलिसांनी सहा पोलिसांविरूद्ध दाखल केला गुन्हा
3 मोठी बातमी : मुंबईत १५ जुलैपर्यंत जमावबंदी लागू
Just Now!
X