राज्याचे क़ृषीमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते पांडुरंग फुंडकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. आज पहाटे साडेचारच्या सुमारास त्यांनी मुंबईतील सोमय्या रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ते ६७ वर्षांचे होते. श्वसनाचा त्रास जाणवत असल्याने त्यांना बुधवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या मागे पत्नी आणि दोन मुले आहेत. फुंडकर यांच्या पार्थिवावर खामगाव येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.

फुंडकर हे भाजपाच्या पहिल्या फळीचे नेते होते. त्यांनी यापूर्वी पक्षाचे प्रदेशाध्यक्षपदही सांभाळले होते. वर्ष १९९१ ते ९६ या काळात त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्षपद सांभाळले. फुंडकर यांनी तीन वेळा अकोला लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. त्यांनी १९७८ आणि १९८० मध्ये खामगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. फुंडकर हे विधानपरिषदेतील विरोध पक्षनेतेही होते. ८ जुलै २०१६ रोजी त्यांनी फडणवीस मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली होती.