मुंबई : राज्यात करोनाचा फैलाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे बंद करण्यात आलेल्या कारखान्यांना उपलब्ध कामगारांसह १२ तासांच्या दोन पाळ्यांमध्ये उत्पादन सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. औद्योगिक संघटनांच्या मागणीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्याच्या कामगार विभागाच्या मान्यतेनंतर औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाने नुकताच तसा आदेश जारी केला आहे. कामगारांना अधिकच्या चार तासांच्या कामाचा दुप्पट मोबदला मिळणार आहे.

टाळेबंदी लागू झाल्यानंतर अलीकडेच ५० टक्के  कामगारांच्या उपस्थितीत कारखाने सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. परंतु करोनाच्या प्रादुर्भावाच्या भीतीने कामगार कामावर जायला तयार नाहीत. बरेच कामगार आपापल्या गावी निघून गेले आहेत. त्यामुळे कामगारांची कमतरता भासत आहे.

कारखाना अधिनियमानुसार कामगारांना दिवसाचे फक्त ८ तास काम देण्याची तरतूद आहे. त्यामुळे कमी मनुष्यबळात कारखाने सुरू करणे अशक्य झाले होते. कॉन्फे डरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री आणि मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चर या संघटनांनी राज्य शासनाला दिलेल्या निवेदनात, कामगारांचे कामाचे तास वाढवून कारखाने सुरू करण्यास परवानगी द्यावी. अशी विनंती के ली होती. त्यावर काही अटी व शर्तीसह कारखान्यांना तशी परवानगी देण्यात आल्याची माहिती राज्याचे औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे संचालक डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिली.

कारखाना अधिनियम १९४८ च्या कलम ५१, ५२, ५४ व ५६ मध्ये कामगारांचे कामाचे तास व साप्ताहिक सुटय़ांची तरतूद करण्यात आली आहे. याच कायद्याच्या कलम ६५(२) प्रमाणे अपवादात्मक परिस्थितीत या कलमांमधून सूट देण्याचे अधिकार राज्य सरकारला आहेत. अर्थात कामगारांची कमतरता भासत असणाऱ्या कारखान्यांनाच ही सूट देण्यात आली आहे. त्याचबरोबर कामगारांना जादा कामाचे दुप्पट वेतन देणे, त्यांच्या सुरक्षेची काळजी घेणे, या अटी औद्योगिक संघटनांनी मान्य केल्या आहेत.

वाढीव तासांसाठीच्या अटी

* दिवसाचे कामाचे तास १२ पेक्षा जास्त असता कामा नयेत.

* विश्रांतीचा एक  तास धरून १३ पेक्षा अधिक तास असू नयेत.

* अतिकालिक कामाचे वेतन हे साधारण वेतनाच्या दुप्पट दराने.

* कोणत्याही कामगाराला सलग अतिकालिक काम देऊ नये.

* करोना विषाणूचा फै लाव रोखण्यासाठी आवश्यक  ती खबरदारी कारखान्यांनी घ्यावी.

* कारखान्यांतील उत्पादक प्रक्रियेदरम्यान दोन कामगारांमध्ये सुरक्षित अंतर ठेवावे, तसेच मुखपट्टी (मास्क)चा वापर अनिवार्य.