‘भारतमाता की जय’वरून झालेल्या गोंधळानंतर विधानसभेत तिरंग्यावरून मंगळवारी वादावादी झाली. विरोधी सदस्यांनी तिरंग्याचा अपमान केल्याचा आरोप भाजपच्या सदस्यांनी करताच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून चुका झाल्याचा मुद्दा प्रत्युत्तरादाखल विरोधकांनी मांडल्याने सत्ताधारी सदस्य संतप्त झाले.

‘भारतामाता की जय’वरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानाची सोमवारी प्रतिक्रिया उमटली होती. सभागृहात गोंधळ झाला होता. तेव्हा सभागृहात विरोधी सदस्यांनी तिरंगा झेंडा फडकविताना राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा मुद्दा भाजपचे आशीष शेलार यांनी उपस्थित करून या सदस्यांच्या विरुद्ध कारवाईची मागणी केली. जितेंद्र आव्हाड हे डाव्या हातात उलटा झेंडा घेऊन सभागृहात फिरत होते, असा आरोपही शेलार यांनी केला. तसेच एका सदस्याने झेंडय़ाने तोंड पुसल्याचे शेलार यांनी सांगताच सत्ताधारी भाजपचे सदस्य आक्रमक झाले.

राष्ट्रध्वजाचा अपमान करणाऱ्या सदस्यांच्या विरोधात कारवाई झालीच पाहिजे, अशी भाजप सदस्यांची मागणी होती. राष्ट्रध्वजाच्या अपमानाची चित्रफीत असून ती पाहून कारवाई व्हावी, अशी मागणी गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी केली. त्यावर ही चित्रफीत कोणी तयार केली व त्याची वैधता काय, असा सवाल जयंत पाटील यांनी केला.

दोन्ही बाजूंचे सदस्य आक्रमक झाले आणि घोषणाबाजी सुरू झाल्याने अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी अर्धा तासाकरिता कामकाज तहकूब केले.

या वेळी भाजपचे राज पुरोहित हे ‘देश के गद्दारों को’ अशा घोषणा देऊ लागताच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांनी ‘जुते मारो भाजप को’ असे प्रत्युत्तर दिल्याने गोंधळात अधिकच भर पडली. आव्हाड व अन्य सदस्यांच्या विरोधात कारवाईसाठी भाजपचे सदस्य आक्रमक झाले असतानाच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लखनौमध्ये झेंडावंदन झाले तेव्हा राष्ट्रध्वज उलटा फडकविण्यात आला होता तसेच रशियामध्ये पंतप्रधान मोदी हे राष्ट्रगीत सुरू असताना चालत गेल्याचे निदर्शनास आणून दिले. हे सारे अवधानाने झाले असेल, पण ती चूकच होती, असे पाटील म्हणाले.

  • पंतप्रधानांचा उल्लेख कामकाजातून वगळण्यात यावा, अशी भाजप सदस्यांची मागणी होती.
  •  याबाबत तपासून निर्णय घेतला जाईल, असे अध्यक्ष बागडे यांनी जाहीर केले.
  • राष्ट्रध्वजाच्या अपमानाबद्दल राष्ट्रध्वजाची संहिता तसेच चित्रफीत बघून निर्णय घेऊ, असे बागडे यांनी सांगितले.