X

“नशीब अब की बार ट्रम्प सरकार कुणी ऐकलं नाही, नाहीतर…!” मुख्यमंत्र्यांचा थेट पंतप्रधानांना टोला!

अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे.

करोनाचं संकट महाराष्ट्रावर ओढवल्यानंतर महाराष्ट्र विधिमंडळाचं पहिलंच पूर्णवेळ अधिवेशन सध्या सुरू असून या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. अधिवेशनाच्या पहिल्या दोन दिवसांमध्ये विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना वेगवेगळ्या मुद्द्यांवरून घेरल्यानंतर आता सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांना उत्तर दिलं जात आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. यामध्ये त्यांनी त्यांच्या खास शैलीमध्ये विरोधकांना खोचक टोले लगावले. यावेळी विधानसभेत बोलताना त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच अप्रत्यक्षपणे टोला लगावला.

“शेठजींची चिंता जरूर करा”

राज्याच्या काही भागांमध्ये पुन्हा निर्बंध लागू करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर विरोधकांनी टीका केली होती. यामध्ये अमरावती, औरंगाबाद, जालना, नाशिक अशा राज्याच्या काही भागांमध्ये पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले आहेत. वाढत्या करोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा लॉकडाऊन लागू करावा का? या चर्चेवरून बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “लॉकडाऊन पुन्हा लागू करायचा का? अशी चर्चा आहे. तुम्ही व्यापाऱ्यांची चिंता जरूर करा. शेठजींची चिंता जरू करा. ते जर नसतील तर अर्थचक्र चालणार नाही. त्यासाठी व्यापारी, कामगार, शेतकरी सगळेच हवेत. पण युकेमध्ये अजूनही लॉकडाऊन आहे, जर्मनीमध्ये लॉकडाऊन केला, इटलीत केला, ऑस्ट्रेलियामध्ये केला. अमरावतीपेक्षा ब्रिटनची आरोग्यव्यवस्था कमी आहे का? अमेरिकेची आरोग्य व्यवस्था अमरावतीपेक्षा कमी आहे का?” असा सवाल त्यांनी केला. यावेळी, “नशीब अमेरिकेत अब की बार ट्रम्प सरकार कुणी ऐकलं नाही. नाहीतर अजून वाट लागली असती”, असा टोमणा त्यांनी पंतप्रधानांना मारला.

अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकांच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘अब की बार मोदी सरकार’च्या धर्तीवर ‘अब की बार ट्रम्प सरकार’, अशी घोषणा दिली होती. त्यावरून मुख्यमंत्र्यांनी निशाणा साधला.

दरम्यान, यावेळी विरोधकांना देखील मुख्यमंत्र्यांनी सुनावले. “सगळं उघडा असं जे म्हणतात त्यांच्यासाठी ‘मी जबाबदार’ ही मोहीम आहे. मला राज्याच्या जनतेची काळजी आहे. मला कुणीही व्हिलन ठरवलं, तरी चालेल, तरी मी जनतेच्या हिताची काळजी घेणार म्हणजे घेणारच. कसलाही अभ्यास नाही, पण कोणत्यातरी एका वर्गासाठी तुम्ही संपूर्ण गावाला, राज्याला धोक्यात घालणार असाल, तर जे असं करणार त्यांना देखील मी तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही”, असं मुख्यमंत्री म्हणाले.

“मराठी भिकारी आहे का?, महाराष्ट्र भिकारी आहे का?, आम्ही काय…”; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानसभेत संतापले

23
READ IN APP
X