दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाबाबतचे सुधारित विधेयक आज सांयकाळी विधानसभेत एकमताने संमत करण्यात आले. राज्यमंत्री रणजित पाटील यांनी हे विधेयक सादर केले. या विधेयकाला भाजपसह मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादीनेही पाठिंबा दिला. हे विधेयक संमत करतेवेळी शिवसेनेचे मंत्री व आमदार उपस्थित नव्हते, असे वृत्त एबीपी माझा या वृत्त वाहिनीने दिले आहे.

शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी महापौर बंगल्याची जागा देण्याचा निर्णय नगरविकास विभागाने यापूर्वीच घेतला असून त्याबाबतची अधिसूचनाही काढली होती. महापौर बंगल्याची जागा पालिकेच्या मालकीची असल्यामुळे ती स्मारक समितीला हस्तांतरित करण्यासाठी सुधार समितीची आणि सभागृहाचीही मंजुरी मिळाली होती. शिवसेनाप्रमुखांच्या स्मृती जपण्यासाठी लोकाग्रहास्तव त्यांचे भव्य स्मारक उभारल्यास भावी पिढीला ते स्फूर्तिदायक ठरेल या विचाराने भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. महापौर बंगल्याच्या ११,५५१.०१ चौरस मीटर जागेत बाळासाहेबांचे स्मारक उभारण्यात येणार आहे.

विधेयक मांडण्यात येणार असल्याची माहिती न दिल्यामुळे सेनेच्या ज्येष्ठ मंत्र्यांनी प्रतोदांना धारेवर धरल्याचे वृत्त एबीपी माझा या वृत्त वाहिनीने दिले आहे.