महाराष्ट्र एटीएसने शनिवारी मुंब्रा येथून एका संशयित दहशतवाद्याला अटक केली आहे. या दहशतवाद्याला औरंगाबाद कोर्टात  हजर करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यापासून एटीएसने संशयित दहशतवाद्यांची धरपकड करण्याची कारवाई सुरू केली आहे.

ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथून एका २४ वर्षीय आरोपीकडून लॅपटॉप, हार्डडिस्क, टॅबलेट, पेनड्राईव्हस, राऊटर असे साहित्य जप्त करण्यात आले आहे. आयसिस या दहशतवादी संघटनेसाठी काम करत असल्याच्या संशयावरून एटीएसने २२ जानेवारीला मुंब्रा आणि औरंगाबादमधून एकूण ९ जणांना अटक केली होती. आता ही संख्या १० वर गेली आहे.

तलहा उर्फ अबूबकर हनिफ पोतरीक, रा. एम्ब्रॉड टॉवर, दोस्ती प्लॅनेट नॉर्थ, शील डायघर, मुंब्रा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून ही कारवाई औरंगाबाद एटीएसने मुंब्र्यात जाऊन केली. अबूबकर हा ऑगस्ट २०१८ ते जाने. २०१९ या काळात राज्यात आयसिस कडून होणार्‍या उपद्रवांचा माहितगार होता. गेल्या सात महिन्यात आयसिसच्या झालेल्या संपूर्ण बैठकांचा तपशील अबूबकरकडे होता.एटीएएसने त्याला १४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी मागितली होती. परंतु न्यायालयाने ५ फेब्रुवारीपर्यंत कोठडी मंजूर केली आहे.

 दरम्यान, औरंगाबादमध्ये कैसर कॉलनी, गणेश कॉलनी या भागात एटीएसचे पथक स्लीपरसेलमधे समाविष्ठ असलेल्या संशयितांची कसून चौकशी करत आहे.अशी माहिती वरिष्ठ सुत्रांनी दिली आहे.