18 February 2019

News Flash

तीन संशयित हिंदुत्ववादी अतिरेकी अटकेत

राज्याच्या विविध भागांत घातपात घडविण्याचा या टोळीचा कट होता, असा पोलिसांचा दावा आहे.

1) वैभव राऊत : 2)महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने नालासोपारा येथे शुक्रवारी वैभव राऊत याच्या घरावर छापा घातला.

दहशतवादविरोधी पथकाची धडक कारवाई, २० गावठी बॉम्ब हस्तगत

मुंबई : राज्य दहशतवादविरोधी पथकाने गुरुवारी रात्री केलेल्या धडक कारवाईत वैभव राऊत  (वय ४०) या तरुणासह नालासोपारा आणि पुण्यातून तीन संशयित हिंदुत्ववादी अतिरेक्यांना अटक केली आहे.

राऊत याच्या घरातून आणि दुकानातून २० गावठी बॉम्ब, स्फोटके आणि बॉम्ब बनविण्याचे साहित्यही हस्तगत करण्यात आले असून या तिघांच्या संपर्कात आलेल्या १६ जणांची चौकशीही करण्यात येत आहे. राज्याच्या विविध भागांत घातपात घडविण्याचा या टोळीचा कट होता, असा पोलिसांचा दावा आहे.

अटक झालेल्या आरोपींनी स्वत: टोळी करून घातपाताची तयारी चालवली होती की त्यांच्यामागे एखादी संघटना वा व्यक्ती आहे, याचा शोध घेण्यास अग्रक्रम दिला जाणार आहे,असे ‘एटीएस’ने सांगितले. हे आरोपी मुंबईसह नालासोपारा, पुणे, सातारा, सोलापूर या ठिकाणी बॉम्बस्फोट किंवा घातपाती कारवाया करण्याच्या तयारीत होते, असा संशय एटीएसने न्यायालयात व्यक्त केला. न्यायालयाने तिघांना १८ ऑगस्टपर्यंत एटीएस कोठडी दिली आहे.

एटीएसप्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार खबऱ्याने दिलेली माहिती, मोबाइल क्रमांक याआधारे गेल्या दोन आठवडय़ांपासून या तिघावर पोलिसांची बारीक नजर होती. काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागताच ही कारवाई केली गेली.

सोपारा गावातील भंडार आळीतील दोन मजली घरापासून काही अंतरावर असलेल्या ‘साई दर्शन’ या इमारतीच्या तळमजल्यावरील दुकानात हे बॉम्ब ठेवले होते. हे बॉम्ब कमी तीव्रतेचे असून त्यामुळे बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण हे तरुण घेत होते का, या दृष्टीनेही तपास होत आहे. हे बॉम्ब, स्फोटके आणि अन्य वस्तू तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोग शाळेत पाठविण्यात आल्या आहेत. प्रयोगशाळेच्या अहवालातून अनेक गोष्टी स्पष्ट होतील, असे एटीएसचे म्हणणे आहे.

‘साई दर्शन’ ही निवासी इमारत चार मजली आहे. वैभवने ज्या दुकानात बॉम्ब ठेवले होते त्या दुकानाला लागूनच औषधाचे दुकान आहे. तर समोर बाजारपेठ आहे. त्याने बॉम्ब उघडय़ावर ठेवले होते. भरवस्तीत अशा प्रकारे बॉम्ब ठेवणे आणि बॉम्बसाठी लागणारे साहित्य ठेवणे हे धोकायदाक होते असे पोलिसांनी सांगितले. एवढय़ा उघडय़ावर त्याने ही स्फोटके कशी ठेवली, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.

तयार बॉम्ब, बॉम्ब बनविण्याचे साहित्य आणि स्फोटके स्वत:जवळ ठेवणारे हे आरोपी दहशतवादी टोळी किंवा संघटनेतील वरच्या फळीतील असावेत, असा अंदाज आहे. हे बॉम्ब कशासाठी तयार केले, साहित्य कुठून आणि कसे मिळवले, त्याचा वापर कुठे-कसा होणार होता, अन्य साथीदार कोण कोण आहेत, याची कसून चौकशी केली जाणार आहे. त्याचबरोबर मालेगावसह आधी घडलेल्या काही घातपातांतही हे आरोपी सामील होते का, याचीही सखोल चौकशी केली जाणार आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि गौरी लंकेश यांच्या हत्येसंदर्भातही या तिघांची चौकशी होणार आहे.

या तिघांविरोधात गैरकृत्ये प्रतिबंधक कायद्यातील १६, १८, २०, भारतीय दंड संहितेतील कलम १२०ब, भारतीय स्फोटके कायदा आणि स्फोटजन्य पदार्थ कायद्यातील विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला.

हस्तगत बॉम्ब, अन्य वस्तू

राऊत याच्या घरी आठ तयार गावठी बॉम्ब सापडले. तर त्याच्या दुकानातून १२ तयार गावठी बॉम्ब आणि स्फोटकांसह अन्य आवश्यक वस्तूंचा मोठा साठा हस्तगत केला गेला. या वस्तूंत २ जिलेटीन कांडय़ा, ४ इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर, २२ नॉन इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर, सेफ्टी फ्यूज वायर, साधारण दीडशे ग्रॅम शुभ्र रंगाची भुकटी, पॉयझन असे लिहिलेल्या दोन एक लिटर द्रव्याच्या बाटल्या, १० बॅटरींचा संच, एक ६ वॉल्टची बॅटरी, कटर आणि एक्सो ब्लेड, सोल्डरिंग मशीन, ३ स्वीच, ३ पीसीबी सर्किट, ६ बॅटरी कनेक्टर, ४ रीले स्वीच, ८ रेझीस्टर, ६ ट्रान्झीस्टर, वायरचे तुकडे, मल्टीमीटर, हातमोजे, सोल्यूशन यांचा समावेश होता. एटीएसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार या वस्तूंसह आरोपी आणखी बरेच बॉम्ब(आयईडी) तयार करू शकले असते.

‘सनातन’वर बंदीची मागणी

येत्या बकरी ईदला राज्यात घातपात घडविण्याचाच हा कट होता, असे दिसत असून आता तरी सरकारने सनातन आणि हिंदू जनजागृती समितीसारख्या विघातक संघटनांवर बंदी घालावी, अशी मागणी  विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.  याप्रकरणी सखोल तपास व्हावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही केली आहे.

बॉम्ब तयार करण्याच्या सूचना, चित्र

आरोपींच्या घरातून २० गावठी बॉम्ब आणि स्फोटकांबरोबरच काही कागदपत्रे सापडली. त्यात बॉम्ब तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंची माहिती, बॉम्ब बांधण्यासाठी आवश्यक असलेली क्रमवार प्रक्रिया आणि बॉम्बसाठीच्या  सर्किटचे एका कागदावरील चित्र सापडले.

पोलिसांशी मैत्री

वैभव राऊतची स्थानिक पोलिसांमध्ये चांगलीच उठबस असल्याची बाबही उघड झाली आहे. पोलीस दलात त्याचे अनेकांशी मैत्रीचे संबंध होते आणि ते का होते, याचाही शोध घेतला जाणार आहे. विशेष म्हणजे नालासोपारा पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर असलेल्या भंडार आळीत मुंबई पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने गुरुवारी रात्री छापे घातले तेव्हा स्थानिक पोलीस ठाण्याला खडबडून जाग आली. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेनेही या प्रकरणाचा समांतर तपास करण्याचे ठरवले आहे.

गावकऱ्यांकडून पाठराखण

वैभव राऊतच्या अटकेने ग्रामस्थांना आणि त्याच्या मित्रांना धक्का बसला आहे. राऊत घराणे गावात प्रतिष्ठित आहे. वैभव हा हिंदुत्ववादी होता, पण तो असे घातपाती प्रकार करणे शक्यच नाही. त्याला पोलिसांनी नाहक गोवले आहे, असा गावकऱ्यांचा आरोप आहे. पंचनामा करताना पोलिसांनी एकाही ग्रामस्थाला का सोबत नेले नाही, असा सवालही केला जात आहे.

फेसबुक, ट्विटरपासून फारकत

वैभव याने दोन वर्षांपासूनच फेसबुकपासून फारकत घेतली होती. विशेष म्हणजे फेसबुकवरील सर्व संदेश नष्ट केले होते. ट्विटरवरही मागील वर्षी त्याने  शेवटचे ट्विट केले होते. यामुळे पडद्यामागे त्याच्या गोपनीय हालचाली सुरू असल्यास त्याची कल्पना त्याचे मित्र आणि परिचितांना आली नाही.

First Published on August 11, 2018 2:10 am

Web Title: maharashtra ats arrests 3 hindu activist seizes explosive materials