18 January 2019

News Flash

गुजरातमधून संशयित तरुणाला अटक

मन्सुरी फैजलचा मित्र आणि साथीदार आहे. दोघे जोगेश्वरीच्या बेहराम बागचे रहिवासी आहेत.

प्रातिनिधीक छायाचित्र

दहशतवादीविरोधी पथकाची कारवाई

मुंबई : राज्य दहशतवादविरोधी पथकाने(एटीएस) गुजरातच्या गांधीधाम परिसरातून संशयित तरुणाला बुधवारी अटक केली. अल्लारखा मन्सुरी(३०) असे त्याचे नाव असून गेल्या आठ महिन्यांपासून तो गांधीधाम येथे वास्तव्यास होता. गेल्या आठवडय़ात एटीएसने फैजल मिर्झा या पाकिस्तान प्रशिक्षित अतिरेक्याला अटक केली.

मन्सुरी फैजलचा मित्र आणि साथीदार आहे. दोघे जोगेश्वरीच्या बेहराम बागचे रहिवासी आहेत. मन्सुरीचे वडील आणि मोठा भाऊ  व्यवसायानिमित्त गांधीधाम येथे स्थायिक होते. मन्सुरी आईसोबत जोगेश्वरीला राहत होता. शिकलेला मन्सुरी मुंबईत अ‍ॅप आधारित टॅक्सीचालक म्हणून काम करत होता. मात्र प्रवाशांसोबत असभ्य वर्तनाच्या तक्रारी आल्याने त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते. आठ महिन्यांपूर्वी वडिलांचे निधन झाल्यानंतर तो गुजरातेत गेला, अशी माहिती ‘एटीएस’ला मिळाली.

पाकिस्तानातून प्रशिक्षण घेऊन आल्यानंतर फैजलवर मुंबई, गुजरात आणि उत्तर प्रदेशात दहशतवादी हल्ले, घातपात घडवण्याची जबाबदारी होती. त्यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ उपलब्ध करून देणे, शस्त्र, स्फोटकांची वाहतूक करणे आणि सर्वतोपरी सहकार्य करणे ही प्रमुख जबाबदारी मन्सुरीने घेतली होती.

मन्सुरीला ताब्यात घेताना पुढील तपासासाठी आवश्यक असलेले साहित्य एटीएसने जप्त केल्याची माहिती मिळाली आहे. गुजरातच्या वास्तव्यात केलेल्या प्रत्येक हालचाली जाणून घेण्यासाठी एटीएसकडून मन्सुरीची कसून चौकशी सुरू असल्याचे पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांनी प्रसार माध्यमांना दिली.

भ्रमणध्वनी हस्तगत

एटीएसने फैजलकडून तीन भ्रमणध्वनी हस्तगत केले. त्यांपैकी एक त्याने पाकिस्तानमधील वास्तव्यात वापरला होता. या भ्रमणध्वनीची चाचपणी एटीएसकडून सुरू आहे.

पैशांसाठी दुष्कृत्य करण्याची तयारी

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’ला दिलेल्या माहितीनुसार फैजलला प्रशिक्षणासाठी पाकिस्तानात धाडणाऱ्या फारुख देवडीवला या म्होरक्याशी(हॅण्डलर) मन्सुरीही सतत संपर्क ठेवून होता. मन्सुरी पाकिस्तानात प्रशिक्षणासाठी गेला नव्हता मात्र पैशांसाठी काहीही करण्याची त्याची तयारी होती. त्यामुळे फैजलपाठोपाठ झालेली ही दुसरी अटक एटीएससाठी महत्त्वाची आहे. फैजल पाकिस्तानात गेला हे मन्सुरीला माहीत होते.

First Published on May 17, 2018 4:43 am

Web Title: maharashtra ats arrests gujarat man for being in touch with terror