मुंबई : पुणे आणि अहमदनगर येथे सापडलेल्या पार्सल-लेटरबॉम्बच्या अनुषंगाने राज्य दहशतवादविरोधी पथक (एटीएस) संशयित हिंदुत्ववादी अतिरेक्यांची चौकशी करत आहे.

नालासोपारा आणि पुण्यातून अटक केलेल्या वैभव राऊत, शरद काळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर यांच्याकडून हस्तगत केलेली स्फोटके आणि तत्सम सामग्रीमुळे एटीएसने लेटर बॉम्ब प्रकरणात त्यांची चौकशी सुरू केल्याचे समजते. काश्मीरमधील लहान मुलांसाठी कार्य करणाऱ्या सरहद या सामाजिक संस्थेचे प्रमुख संजय नहार यांच्यासाठी मार्चमध्ये एक पार्सल अहमदनगरच्या कुरिअर कंपनीकडे आले होते. त्यात पोर्टेबल रेडिओ होता. कंपनीतील कामगारांनी उत्सुकतेपोटी पार्सल उघडले. त्यांनी रेडिओ सुरू करण्याचे प्रयत्न करताच त्याचा स्फोट झाला. त्यात तीन कामगार जखमी झाले.

मे २०१६मध्ये पुण्यातील फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) तत्कालीन प्रमुखांच्या नावे एक पार्सल आले होते. त्यात डिटोनेटर आणि एक पिवळसर रसायन होते. सोबत एक पत्रही होते. त्यात विद्यार्थीनेता कन्हैयाकुमारला ठार मारण्याची धमकी दिली होती. एफटीआयआयच्या प्रमुखपदी अभिनेते गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीबाबत कन्हैयाने केंद्र सरकारवर टीका केली होती. काही दिवसांनी अशाच स्वरूपाचा लेटरबॉम्ब रानडे इन्स्टिटय़ूटलाही आला होता.

अहमदनगर पार्सलबॉम्ब स्फोट, एफटीआयआय आणि रानडे इन्स्टिटय़ूटला आलेला लेटरबॉम्ब- या तिन्ही प्रकरणांत हस्तगत केलेले रसायन, स्फोटके आणि संशयित अतिरेक्यांकडे सापडलेला स्फोटकांचा साठा यात साम्य आहे. त्यामुळे तिघांचीही चौकशी सुरू असल्याची माहिती एटीएसच्या सूत्रांनी दिली.

दाभोलकर-पानसरे हत्येशी संबंध?

पुरोगामी, डाव्या विचारसरणीच्या नेत्यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या पोलीस यंत्रणांशी समन्वय ठेवून संशयित हिंदुत्ववादी दहशतवाद्यांची कसून चौकशी करण्यात येत असल्याचे एटीएसच्या सूत्रांनी सांगितले. या संशयित दहशतवाद्यांची यापूर्वी घडलेल्या दहशतवादी कारवायांबाबत चौकशी करण्यात येईल, असे एटीएसचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनीही स्पष्ट केले होते.