सर्व घटकांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं आश्वासन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं. अनुसुचित जाती, जमातींच्या आरक्षणाला १० वर्षांची मुदतवाढ देण्यासाठी मंगळवारी विधानसभेच्या एक दिवसीय विशेष अधिवेशन भरवण्यात आलं होतं. सुरूवातीला अभिभाषणादरम्यान राज्यपाल बोलत होते. संसदेत हे विधेयक यापूर्वीच संमत करण्यात आलं आहे.

सर्व घटकांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना पुढे नेण्यासाठी सरकार काम करेल. तसंच महिला सुरक्षेसाठी सर्व त्या उपाययोजना करण्यात येत आहेत, असं राज्यपाल यावेळी म्हणाले. शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारनं प्रयत्न केले आहेत. सरकारनं शेतकऱ्यांचे दोन लाखांपर्यंतचं कर्ज माफ केल्याचं त्यांनी सांगितलं. अभिभाषदरम्यान राज्यसराकरनं केलेल्या योजनांची माहिती राज्यपालांकडून देण्यात आली.

राज्यातील युवकांच्या सर्वांगिण विकासासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील. तसंच त्यांना सुरक्षा पुरवण्यास शासन कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं. तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठीही राज्य शासन काम करणार असल्याचं राज्यपाल म्हणाले.