शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्याविरोधातील याचिका न्यायालयाने फेटाळल्यानंतर राजभवनामध्ये होणाऱ्या पुरस्कार सोहळ्याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. पुरस्कार देण्यास विरोध करणारी मंडळी राजभवन परिसरात धुडगूस घालण्याची शक्यता लक्षात घेऊन मलबार हिल परिसरात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे विरोधकांना या परिसरात फिरकताही आले नाही. मात्र राजभवनाबाहेर घोषणाबाजी करणाऱ्या भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना आवरताना पोलिसांना नाकीनऊ आले.
राजभवनमध्ये बुधवारी सायंकाळी आयोजित केलेल्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार वितरण सोहळ्यात बाबासाहेब पुरंदरे यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याने मलबार हिल परिसरावर सकाळपासूनच पोलिसांची करडी नजर होती. पुरस्काराबाबतची याचिका न्यायालयाने फेटाळल्यामुळे मलबार हिल परिसरातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली. गिरगाव चौपाटी आणि नेपीअन्सी रोडवरून राजभवनाच्या दिशेने जाणारी प्रत्येक गाडीची तपासणी सुरू झाली. प्रत्येकाला कुठे, कशासाठी जाताय याची चौकशी करून आणि ओळखपत्र, असल्यास पॅनकार्डची तपासणी करूनच गाडी सोडण्यात येत होती. कामाशिवाय या परिसरात जाणाऱ्यांना माघारी फिरावे लागत होते. या तपासणीचा फटका मलबार हिल परिसरातील रहिवाशांना बसला. बाबासाहेब पुरंदरे यांना पुरस्कार देऊ नये अशी मागणी करणाऱ्या विविध पुरोगामी संघटनांचे कार्यकर्ते राजभवनाबाहेर आंदोलन करतील अशी शक्यता सर्वानाच वाटत होती. परंतु पोलीस बंदोबस्तामुळे या संघटनांच्या कार्यकर्त्यांना तेथे फिरकताही आले नाही.
कार्यक्रमाची वेळ जवळ येऊ लागताच भाजपच्या युवा मोर्चाचे काही कार्यकर्ते पक्षाचे झेंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, आशीष शेलार, तसेच बाबासाहेब पुरंदरे यांच्या अभिनंदनाचे फलक झळकवीत राजभवनच्या बाहेर थडकले. कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीने हा परिसर दणाणून गेला. त्यामुळे पोलिसांची एकच धावपळ उडाली. सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांपुढे नमते घेत विनंती, विनवण्या करीत पोलिसांना कार्यकर्त्यांना आवार घालावा लागला. भाजपचे मंत्री, नेते मंडळींची गाडी आल्यानंतर या कार्यकर्त्यांचा उत्साह अधिकच वाढत होता. अखेर राजभवनात कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि हळूहळू युवा मार्चाचे कार्यकर्ते पांगले. त्यानंतर पोलिसांनी नि:श्वास टाकला.
विनोद तावडे यांच्या घरात महिला घुसल्या
न्यायालयाने याचिका फेटाळल्यामुळे पुरोगामी संघटनांचे कार्यकर्ते संतप्त झाले. जिजाऊ ब्रिगेडमधील काही महिला थेट मंत्रालयासमोरील शालेय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या शासकीय निवासस्थानात घुसल्या. प्रचंड घोषणाबाजी करीत त्यांनी तावडे यांचे निवासस्थान दणाणून सोडले. अखेर पोलिसांनी या महिलांना अटक केली. जिजाऊ ब्रिगेडच्या कार्यकर्त्यां महिलांच्या या पवित्र्यामुळे खबरदारी म्हणून या परिसरातील अन्य मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानाचे दरवाजे बंद करून घेण्यात आले.
मनसेचे आंदोलन
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्यास विरोध करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचा निषेध करण्यासाठी मनसेचे कार्यकर्ते बुधवारी दुपारी लालबाग परिसरात मोठय़ा संख्येने रस्त्यावर उतरले होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करीत मनसेच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला होता. तसेच मनसेच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. त्यामुळे काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती.
राष्ट्रवादीच्या महिलांचा हल्लाबोल
मनसेच्या कार्यकर्त्यांनी लालबाग येथे शरद पवार यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संतप्त झाले. लालबाग येथील मनसेच्या गडावर मुंबई महिला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हल्लाबोल केला. मनसेचे कार्यलय बंद असल्यामुळे तेथील फलकावरील राज ठाकरे यांच्या छायाचित्राला राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी काळे फासून निषेध केला.