केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांची तातडीने भेट
केंद्र सरकारचा प्रस्तावित आदर्श भाडेकरू कायदा लागू झाल्यास भाडेकरूंवर बेघर होण्याची पाळी येणार असल्यामुळे सर्वच राजकीय पक्ष या प्रस्तावित कायद्याला विरोध करीत असतानाच भारतीय जनता पार्टीने एक पाऊल पुढे जाऊन थेट केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकया नायडू यांची तातडीने भेट घेतली. तसेच संबंधित केंद्रीय सहसचिवांकडूनही या प्रस्तावित कायद्याबाबत चर्चा केली.
या प्रस्तावित कायद्यामुळे राज्यातील भाडेकरूंवर संकट येणार असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने ४ एप्रिल रोजी प्रकाशित केले. हे वृत्त प्रकाशित होताच भाजपचे आमदार राज पुरोहित यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन भाडेकरूंच्या हक्कांचे रक्षण करण्याची विनंती केली. या प्रस्तावित कायद्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वाखाली निदर्शनेही करण्यात आली होती.
विधिमंडळात विरोधकांनी हा विषय मांडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दखल घेत भाडेकरूंवर अन्याय होऊ देणार नाही, असे स्पष्ट केले. त्याचवेळी गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता, पुरोहित यांच्यासह मुंबई भाजपचे अध्यक्ष अ‍ॅड. आशीष शेलार यांनी दिल्लीत जाऊन नायडू यांची भेट घेतली. प्रस्तावित कायद्यात भाडेकरूंवर अन्याय होऊ नये, अशी विनंतीही या शिष्टमंडळाने केली. हा आदर्श कायदा असून राज्याला बंधनकारक नाही. तरीही या कायद्याबाबत सर्व राज्यांची मते जाणून घेतल्यानंतरच निर्णय घेण्यात येईल आणि हा कायदा भाडेकरूंच्या हिताचाच असेल, असे नायडू यांनी स्पष्ट केल्याचे अ‍ॅड. शेलार यांनी सांगितले.
या शिवाय केंद्रीय गृह विभागाचे सहसचिव मिश्रा यांच्याशीही चर्चा केली. प्रस्तावित कायद्यामुळे नेमकी परिस्थिती काय होईल याची जाणीव करून दिली. केंद्र आणि राज्य शासनातील संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊनच प्रस्तावित कायद्यातील तरतुदी ठरवल्या जातील, असे आश्वासनही मिश्रा यांनी दिले.