निवडणूक प्रतिज्ञापत्रात शिक्षणाबाबत विसंगत माहिती सादर केल्याने पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर वादात अडकले असतानाच त्यांनी कौटुंबिक माहितीही दडविल्याचा आरोप काँग्रेसने शुक्रवारी केला. मतदार यादीत लोणीकर यांच्या दोन पत्नींची नावे असली तरी निवडणूक प्रतिज्ञापत्रात एकाच पत्नीची मालमत्ता दर्शवून त्यांनी फसणूक केल्याचा मुद्दा मांडून काँग्रेसने पुन्हा एकदा लोणीकर यांना लक्ष्य केले.
मतदार यादीत लोणीकर कुटुंबातील पाच सदस्यांची नावे आहेत.  वंदना आणि मंदाकिनी या दोन महिलांच्या नावांपुढे पतीचे नाव बबनराव यादव अशी नोंद करण्यात आली आहे. लोणीकर यांनी मतदारयादीत बबनराव यादव अशा नावाने नोंद केली आहे. मात्र ते बबनराव लोणीकर या नावाने ओळखले जातात. २००९ आणि २०१४च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात लोणीकर यांनी एकाच पत्नीचा उल्लेख केला आहे. मतदार यादीत तसेच निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर यादव कुटुंबातील पाच सदस्यांची नावे दर्शविण्यात आली आहेत. प्रतिज्ञापत्रात मंदा यांच्या नावे असलेली मालमत्ता दाखविण्यात आली आहे, पण दुसऱ्या पत्नीच्या नावे मालमत्ता काहीच दाखविण्यात आलेली नाही. ही माहिती दडवून लोणीकर यांनी दिशाभूल केल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्रकार परिषदेत केला. या संदर्भात लोणीकर यांनी स्पष्टीकरण करण्याची मागणीही काँग्रेसने केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नैतिकतेचे धडे देतात, पण त्यांच्याच पक्षाच्या मंत्र्याकडून माहिती दडविली जाते. लोणीकर यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
लोणीकर यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात शैक्षणिक पात्रतेच्या संदर्भात खोटी माहिती सादर केली. याबाबत ओरड होताच लोणीकर यांच्या वेबसाईटवरील बी.ए. ही पदवी कशी काय गायब झाली, असा सवालही सावंत यांनी केला.  काँग्रेसच्या आरोपांच्या संदर्भात लोणीकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
काँग्रसची टीका
लोणीकर यांना दोन पत्नी आहेत म्हणून आमचा आक्षेप नाही. पण निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांनी एका पत्नीची माहिती दडवून फसवणूक आणि दिशाभूल केल्याचा आरोप सावंत यांनी केला.