मूल्यवर्धित करामध्ये VAT अर्धा टक्का वाढ करण्याचा प्रस्ताव अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी विधानसभेत सादर केलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात ठेवण्यात आला आहे. घोषित वस्तू वगळता इतर सर्व वस्तूंवर नव्या आर्थिक वर्षात पाच टक्क्यांऐवजी साडे पाच टक्के कर आकारण्यात येणार आहे.
वस्तू व सेवा कर GST लागू झाल्यानंतर राज्याच्या महसुलात तूट येण्याची शक्यता आहे. या तुटीकरता नुकसान भरपाई देण्याचे केंद्र सरकारने जाहीर केलेले आहे. ही नुकसान भरपाई संबंधित राज्याने जीएसटी लागू होण्यापूर्वीच्या वर्षामध्ये राज्याने करापोटी जमा केलेल्या महसुलावर आधारित असणार आहे. त्यामुळे अधिक महसूल भरपाई मिळण्यासाठी व्हॅटमध्ये अर्धा टक्का वाढ करण्यात आली असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या पीक नुकसान भरपाईसाठी एक ऑक्टोबर २०१५ पासून पेट्रोल, डिझेल, देशी-विदेशी मद्य, सिगारेट, शीतपेय, सोने, हिरे आणि त्यापासून बनविण्यात येणारे दागिने, नकली दागिने यावर करवाढ करण्यात आली होती. ती पुढील आर्थिक वर्षामध्येही कायम ठेवण्यात येणार आहे.
ऊस खरेदी कर माफ
साखरेच्या घसरत्या किंमतीमुळे साखर उद्योग अडचणीत आहे. त्यामुळे साखर कारखान्यांना चालू आर्थिक वर्षासाठीचा ऊस खरेदी कर माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. शासनाच्या धोरणाप्रमाणे साखर निर्यात करणाऱ्या कारखान्यांनाच ही सूट मिळणार आहे.