शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून अधिवेशनाच्या सुरुवातीपासून आक्रमक असलेले विरोधक अगदी अर्थसंकल्पाचे वाचन करतानाही शांत झाले नाहीत आणि विरोधकांच्या घोषणाबाजीतच शनिवारी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढील आर्थिक वर्षासाठीच्या अर्थसंकल्पाचे वाचन सुरू केले. पण याही स्थितीत विरोधकांच्या गोंधळावर कोटी करण्याची संधी मुगगंटीवार यांनी सोडली नाही. अर्थसंकल्पीय भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी सिद्धिविनायकाचरणी एक प्रार्थना केली आणि अर्थसंकल्प ऐकून न घेणाऱ्यांना पुन्हा सभागृहातच पाठवू नको, अशी भावना व्यक्त केली. त्यांच्या या प्रार्थनेनंतर सत्ताधारी बाकांवरील सदस्यांनी दिलखुलासपणे हसत त्यांना दाद दिली.

राज्य विधीमंडळाचे चालू अर्थसंकल्पीय अधिवेशन पहिल्या दिवसापासूनच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून गाजते आहे. त्यातच सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेनेही विरोधकांच्या सुरात सूर मिसळल्यामुळे सरकारची कोंडी आणखीनच वाढलीये. शिवसेनेच्या विरोधाची धार कमी करण्यासाठी शुक्रवारीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांच्या एका शिष्टमंडळासह केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली, कृषिमंत्री राधामोहन सिंह यांची भेट घेतली होती. या शिष्टमंडळामध्ये शिवसेनेचे मंत्रीही सहभागी झाले होते. या भेटीनंतर शिवसेनेचा विरोध मावळला. पण विरोधक याच मुद्द्यावरून शनिवारीही आक्रमक दिसले.

विधानसभेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी टाळ वाजवत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा लावून धरला. त्याचबरोबर यावेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे, अशाही घोषणा देण्यात येत होत्या. विरोधकांच्या गोंधळामुळे अर्थसंकल्पाचे वाचन करताना सुरुवातीच्या काळात मुनगंटीवार यांना अडचण येत होती. सभागृहाचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनीही विरोधकांना शांत राहण्याचे आवाहन केले. पण विरोधक त्यांचेही ऐकण्याचे मनःस्थितीत नव्हते. अखेर विरोधकांच्या गोंधळातच मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पीय भाषणाचे वाचन सुरू केले.