राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवारी विधानसभेत सादर केलेला अर्थसंकल्प केवळ आश्वासनांची गाजरं दाखवणारा आणि निराशाजनक असल्याची टीका विरोधकांनी केली. या अर्थसंकल्पातून जनतेचा अपेक्षाभंग झाला असून, राज्यासाठी काळाकुट्ट दिवस असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पत्रकारांना सांगितले.

अर्थसंकल्पाचे वाचन सुरू असताना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी विधानसभेत घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. त्याचबरोबर टाळही वाजविण्यात येत होते. त्यातच सुधीर मुनगंटीवार यांनी आपले भाषण सभागृहात वाचून दाखवले.

अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर पत्रकारांना प्रतिक्रिया देताना राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले, सरकारने राज्यातील शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची मागणी आम्ही केली होती. पण त्याचे सुतोवाचही केले नाही. अर्थमंत्र्यांनी केवळ राजकीय भाषणबाजी केली. कर्जामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. तरीही सरकारला जाग येत नाही. त्यामुळे आजचा दिवस राज्यासाठी काळाकुट्ट दिवस ठरला आहे. राज्यातील जनतेला केवळ आश्वासनांची गाजरं दाखवण्याचे काम सरकारने केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही या अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त केली. अर्थसंकल्पातून भविष्यातील महाराष्ट्राचे चित्र स्पष्ट होत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. गेल्या अडीच वर्षांच्या काळात राज्यात एकही मोठा प्रकल्प आला नाही किंवा कोणतीही मोठी गुंतवणूक झाल्याचे पाहायला मिळाले नाही. त्यातच राज्याची महसुली तूट चार हजार कोटींवर जाऊन पोहोचली आहे. ती वस्तू व सेवा कराच्या माध्यमातून भरून निघणार नाही. अर्थसंकल्पात त्यावर कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही. भविष्यातील महाराष्ट्र कसा असेल, याचे चित्रही अर्थसंकल्पातून स्पष्ट होत नाही, असेही त्यांनी सांगितले.