बरोबर दुपारी २ वाजता अर्थ व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर विधान परिषदेत दाखल झाले. शुभ्र पोषाख वर काळया रंगाचे जॅकेट. हातात अर्थसंकल्पाची बॅग. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिंना वंदन करून त्यांनी राज्याचा २०१८-१९ चा अर्थसंकल्प वाचायला सुरुवात केली.

विरोधी बाकावर कुजबुज सुरू झाली. सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी विरोधी सदस्यांना शांत राहण्याचे दटावून राज्यमंत्र्यांना अर्थसंकल्प वाचण्याची सूचना केली.

तसे शांत, संयमी स्वभावाचे दीपक केसरकर शेरोशायरी, गझल वगैरे म्हणून वातावरण मोकळे करण्याच्या फंदात न पडणारे. थेट अर्थसंकल्पालाच हात घालणारे राज्यमंत्री. परंतु या वेळी त्यांना कवी मंगेश पाडगावकरांची कविता सादर करण्याचा मोह आवरता आला नाही. मात्र त्यातही त्यांना त्यांच्याच जिभेने दगा दिला. कविता पाडगावकरांची, पण ते म्हणाले कोकणातील कवी मंगेश तेंडुलकर यांची एक सुंदर कविता मी सादर करतो. कविता वाचायला सुरुवात केली.

कोऱ्या कोऱ्या कागदावर असलं जरी छापलं

ओठात आल्याशिवाय गाणं नसतं आपलं

वा वा वा वा दोन्ही बाजूकडून दाद. पण नंतर त्यांच्याच लक्षात आले ही कविता तेंडुलकरांची नाही, तर पाडगावकरांची आहे. तसे त्यांनी सांगितले आणि विरोधकांनी मग एकच गलका सुरू केला. त्यावर प्रांजळपणे केसरकर म्हणाले, ‘स्लिप ऑप टंग’. पुढे मग आकडेमोडीचा अर्थसंकल्प वाचायला सुरुवात झाली. त्यातील योजना, त्यासाठीच्या तरतुदी, घोषणा यावर विरोधी सदस्यांकडून अधून-मधून शेरेबाजी सुरू झाली. मध्येच घोषणा झाल्या, ‘खरे बोला, खरे बोला, केसरकर खरे बोला’. फुसक्या अर्थसंकल्पाचा.. अशी कुणी तरी हळूच हाळी दिली. सभापतींनी त्या सदस्याला शांत बसण्याचे फर्मान सोडले. मग औंटघटकेची शांतता.

अर्थसंकल्पात ‘मॅगनेटिक महाराष्ट्रा’चा उल्लेख आला, त्याला विरोधी सदस्यांनी आक्षेप घेतला. ‘मराठी बोला, मराठी बोला’ असा घोषा लावला. बाजूला कट्टर मराठी प्रेमी मंत्री दिवाकर रावते बसले होते, त्यांना उद्देशून, ‘काय चालले आहे हे रावते साहेब’, अशी शेरेबाजी करून केसरकर यांच्या भाषणात अडथळे आणण्याचा प्रयत्न विरोधकांचा सुरूच होता. सभापती सदस्यांना शांत राहण्याचे आवाहन करीत होते. विरोधी बाकावरील शेरेबाजीकडे फार लक्ष न देता केसरकर यांचे अखंड वाचन सुरू होते. ३ वाजून ४९ मिनिटांनी त्यांचे अर्थसंकल्पाचे वाचन पूर्ण झाले आणि सभागृहाचे आजचे कामकाज संपल्याचे सभापतींनी जाहीर केले.