News Flash

आघाडीतील तिन्ही पक्षांच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमांना अर्थसंकल्पात स्थान

कर्जमाफीचा मुद्दा शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तिन्ही पक्षांसाठी महत्त्वाचा होता.

आघाडीतील तिन्ही पक्षांच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमांना अर्थसंकल्पात स्थान

मुंबई : अर्थसंकल्पात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमांना स्थान मिळाले. अपवाद फक्त काँग्रेसच्या १०० युनिटपर्यंत मोफत विजेचा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघाबरोबरच त्यांच्याकडील पर्यावरण आणि पर्यटन या दोन खात्यांकरिता भरीव तरतूदही करण्यात आली आहे.

कर्जमाफीचा मुद्दा शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तिन्ही पक्षांसाठी महत्त्वाचा होता. याला अर्थसंकल्पात स्थान मिळाले. महाविकास आघाडी सरकारचा हा अर्थसंकल्प फक्त दोन जिल्ह्य़ांपुरता मर्यादित असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. फडणवीस यांनी जिल्ह्य़ांची नावे सांगण्याचे टाळले असले, तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळे मुंबई, तर अजित पवार यांच्यामुळे पुणे जिल्ह्य़ाला झुकते माप मिळाल्याची कुजबुज भाजपच्या गोटातून सुरू झाली.

काँग्रेस नेते व ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी १०० युनिटपर्यंत मोफत वीज देण्याची घोषणा केली होती. यावर असा कोणताही प्रस्ताव नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागे स्पष्ट केले होते. राऊत हे मोफत विजेच्या प्रस्तावावर आग्रही आहेत. अर्थसंकल्पात त्याची काहीच तरतूद करण्यात आलेली नाही. याकडे अजित पवार यांचे लक्ष वेधले असता, ऊर्जा विभागाच्या पातळीवर सध्या अभ्यास सुरू आहे. खात्याचा अहवाल प्राप्त झाल्यावर त्यावर आधी विभागात चर्चा होईल. नंतर ऊर्जामंत्री मंत्रिमंडळासमोर हा प्रस्ताव मांडतील. हा प्रस्ताव आल्यावर साधकबाधक विचार करून निर्णय घेतला जाईल, असे अजितदादांनी स्पष्ट केले.

सुनील केदार, विश्वजीत कदम, यशोमती ठाकूर या काँग्रेस मंत्र्यांकडील खाती किंवा त्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या प्रस्तावांना अर्थसंकल्पात स्थान मिळाले. राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांनी शिकाऊ उमेदवारी योजनेचा गेले दोन महिने पाठपुरावा केला होता. अर्थसंकल्पात त्यासाठी निधीचीही तरतूद करण्यात आली.

शिवसेना

’ आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघाला झुकते माप

’ कोकणातील विविध प्रकल्पांसाठी निधीची तरतूद

’ बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग

’ बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना

’ एस. टी. बसेस खरेदी

’ शिवभोजन थाळी

’ मराठी भाषा भवन

’ आदित्य ठाकरे यांच्याकडील पर्यटन आणि पर्यावरण विभागासाठी वाढीव निधीची तरतूद

राष्ट्रवादी काँग्रेस

’ पुणे रिंगरोड

’ पुणे आणि पिंपरी-चिंचवड मेट्रो

’ ठिबक सिंचन योजना

’ आरोग्य खात्यासाठी जादा तरतूद

’ कौशल्य विकास खात्याची शिकाऊ उमेदवारी योजना

’ रोजगार निर्मिती कार्यक्रम

’ महिला बचत गटांचे सक्षमीकरण

’ तृतीयपंथीयांसाठी कल्याण मंडळ

’ अल्पसंख्याक विकास विभागाच्या तरतुदीत वाढ

काँग्रेस

’ क्रीडा खात्याचे विविध कार्यक्रम आणि निधीची तरतूद

’ क्रीडा विद्यापीठ

’ पुण्यात ऑलिम्पिक भवन

’ महिला व बालकल्याण विभागाचे कार्यक्रम आणि तरतुदींमध्ये वाढ

’ यंत्रमागधारकांना दिलासा

’ इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण विभागाला तीन हजार कोटींची तरतूद

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2020 5:07 am

Web Title: maharashtra budget 2020 maha vikas aghadi budget for all zws 70
Next Stories
1 राज्यात ७५ नवीन डायलिसिस केंद्रे
2 मागासवर्गीयांसाठी २० हजार कोटी; पण नवीन योजनांचा अभाव
3 केंद्रावर राज्याचे खापर ; केंद्राची मदत आठ हजार कोटींनी घटली
Just Now!
X