परिचारक यांच्या बडतर्फीसाठी विरोधक आक्रमक ; विधान परिषदेचे कामकाज तहकूब

मुंबई महापालिकेत शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा देण्याची भूमिका भाजपने घेतली असली, तरी या दोन पक्षांमधील वाद अजूनही धुमसत असल्याची प्रचीती मंगळवारी विधान परिषदेत आली. सीमेवरील जवानांच्या पत्नींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या आमदार प्रशांत परिचारक यांच्या बडतर्फीची मागणी करून भाजपला घेरण्याच्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत शिवसेनाही सहभागी झाली. या मागणीवर विरोधक आक्रमक होते. त्यामुळे पुढे काही गोंधळ व्हायच्या आधीच सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.

विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आमदार परिचारक यांना निलंबित करावे, असा प्रस्ताव मांडला. त्याला काँग्रेसचे शरद रणपिसे व भाई जगताप यांनी पाठिंबा दिला. त्यावर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जवानांच्या पत्नींबद्दल अपशब्द वापरणारा कुणीही असो त्याचे समर्थन केले जाणार नाही, असे सांगितले. मात्र विरोधकांचे त्यावर समाधान झाले नाही. परिचारक यांच्यावर कारवाई का केली नाही, असा प्रश्न विरोधी सदस्यांनी उपस्थित करून भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला.

नीलम गोऱ्हे यांची टीका

सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेनेही या मुद्दय़ावर विरोधकांच्या सुरात सूर मिसळत भाजपवर हल्लाबोल केला. भारतीय लष्करांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राइकचे सर्वानीच समर्थन केले, देशाला त्याचा अभिमान वाटला, मात्र त्याच लष्करातील जवानांबद्दल व त्यांच्या पत्नींची अवेहलना करणारी भाषा केली जाते. अशा वेळी सरकारने स्वत:हून परिचारक यांच्यावर कारवाई करायला हवी होती, असा हल्लाबोल शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी भाजपवर केला. हे सरकार जवानांचा व त्यांच्या कुटुंबांचा आदर करते, असा संदेश देण्यासाठी आमदार परिचारक यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, ही शिवसेनेची भूमिका असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

नारायण राणे यांनी, परिचारक यांचा भाजपने राजीनामा का घेतला नाही, सभागृहात चर्चा व्हायची वाट कशाला बघता, असा सवाल केला. जवानांबद्दल व त्यांच्या पत्नींबद्दल आक्षेपार्ह विधाने करणाऱ्या आमदाराची या सभागृहात बसायची लायकी नाही, असा घणाघाती हल्ला त्यांनी चढविला. परिचारक हे भाजपचे सदस्य नाहीत, असा चंद्रकांत पाटील यांनी खुलासा करण्याचा प्रयत्न केला. त्यावर वाईट काही घडले की ते आमचे नाहीत आणि सत्तेसाठी मात्र अशी माणसे चालतात, असा टोला राणे यांनी भाजपला हाणला.

सभापती निंबाळकर म्हणाले की, जे आपल्यासाठी सीमेवर रक्त सांडतात, त्यांच्याबद्दल कुणी अपशब्द वापरत असेल तर, ती अतिशय गंभीर बाब आहे. हा केवळ राजकारणाचा नव्हे तर नैतिकतेचा विषय आहे. प्रशांत परिचारक यांच्यावरील कारवाईबाबत मुख्यमंत्री व सर्व गटनेते यांच्याबरोबर बैठक व्हावी, अशी अपेक्षा होती, परंतु आज तसे काही होईल, असे दिसत नाही, असे सांगून सभापतींनी दिवसभरासाठी कामकाज तहकूब केले.