News Flash

कर्जमाफीवरून गोंधळ; कामकाज तहकूब

गोंधळामुळे विधानसभेचे कामकाज दोनवेळा तहकूब करण्यात आले.

राज्यातील ८९ लाख शेतकऱ्यांसाठी सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी आणि शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी असल्याचा आरोप करीत विरोधकांनी मंगळवारी सरकारला धारेवर धरले. आतापर्यंत ३१.३३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात १२ हजार ३८१ कोटी रुपयांची रक्कम थेट हस्तांतरीत करण्यात आल्याचा दावा सरकार करीत असले तरी शेतकऱ्यांची यादी का देत नाहीत, असा सवाल करीत विरोधकांनी या प्रश्नावर चर्चेची केलेली मागणी फेटाळण्यात आल्याने झालेल्या गोंधळामुळे विधानसभेचे कामकाज दोनवेळा तहकूब करण्यात आले.

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित केला. सरकारने ८९ लाख शेतकऱ्यांना ३५ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देण्याचे जाहीर केले होते. मात्र अजून शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नाही. आता पुन्हा एखादा शेतकऱ्यांचे अर्ज भरून घेण्याचे सरकारने जाहीर केले आहे. कर्जमाफीच्या घोषणेनंतर राज्यात दोन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून सरकारची ही योजना फसल्याचा आरोप विरोधकांनी केला. अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मात्र स्थगन फेटाळला असून अन्य मार्गाने हा प्रश्न उपस्थित करा असे सांगितले. विरोधकांनी मंत्रालयात आत्महत्या केलेल्या धर्मा पाटील या शेतकऱ्याचे पोस्टर फडकावीत जोरदार घोषणाबाजी केली.

विधान परिषदेतही विरोधक आक्रमक

शेतकऱ्यांच्या गळ्यात पाटय़ा लावून पंचनामे करता, शेतकरी तुम्हाला गुन्हेगार वाटतात का,अशा शब्दांत विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मंगळवारी सरकारवर ‘हल्लाबोल’ केला.  विरोधकांनी यावेळी सभापतींच्या आसनासमोर येऊन सरकारविरोधी जोरदार घोषणा दिल्या. त्यामुळे सभागृहाचे कामकाज एकदा २० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. मात्र, त्यानंतरही गोंधळ कायम राहिल्यामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. शेतकऱ्यांची कर्जमाफी, बोंडअळीचा प्रादुर्भाव, गारपीट आणि धर्मा पाटील यांची आत्महत्या या प्रश्नांवरून धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत स्थगन प्रस्ताव मांडून चर्चेची मागणी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2018 4:16 am

Web Title: maharashtra budget session 2018 maharashtra state assembly adjourned twice
Next Stories
1 मराठी ज्ञानभाषा व्हावी ही सरकारचीही भूमिका
2 शिवसेनेशी निवडणूकपूर्व युतीसाठी भाजपचे प्रयत्न : पृथ्वीराज चव्हाण
3 भिवंडीतील कापड कारखान्याला आग
Just Now!
X