विरोधकांचा आक्षेप, भाजपकडून समर्थन

मुंबई : हरयाणा विधानसभेत जैन धर्मगुरू तरुण सागर यांनी दिलेल्या व्याख्यानावरून वाद झाला असतानाच, राज्य विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात मंगळवारी प्रजापिता ब्रह्मकुमारी भगिनी शिवानी यांचे प्रवचन आयोजित करण्यात आल्याने वादंग निर्माण झाला आहे. महाराष्ट्रात प्रथमच विधिमंडळाच्या सभागृहात धार्मिक प्रवचन होणार असल्याने विरोधकांनी हे घटनाबा असल्याची टीका केली आहे.

हरियाणामध्ये काही वर्षांपूर्वी जैन मुनी तरुण सागर यांचे प्रवचन झाले होते. त्यावरून बराच गदारोळ झाला होता. त्यानंतर  आता राज्याच्या विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात आध्यात्मिक व्यक्तीचे प्रवचन आयोजित करण्यात आले आहे. जीवनात उत्साह निर्माण व्हावा व सकारात्मक वातावरण निर्मिती व्हावी, यादृष्टीने हा कार्यक्रम आयोजित केल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी स्पष्ट केले.

सार्वजनिक जीवनात कशा पद्धतीने वागावे, आनंदी जीवन कसे जगावे, यासह काही मुद्दय़ांवर आमदारांसाठी सकाळी नऊ वाजता हे प्रवचन आयोजित करण्यात आले आहे.  या कार्यक्रमाचे प्रयोजन काय, अन्य धर्मीयांसाठीही अशी परवानगी मिळणार का, असे सवाल माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी उपस्थित केले. तर एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी हे लोकशाहीचे मंदिर असून येथे नियम, कायदेनिर्मिर्तीचे कामकाज चालावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. अर्थसंकल्पीय अधिवेशन आधीच पाच दिवसांचे असून त्यात एक दिवस हे प्रवचन आयोजित करणे चुकीचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

समाजवादीचे आमदार अबू आझमी यांनी विधिमंडळात हे प्रवचन आयोजित करणे घटनाबाह्य असल्याचा आरोप केला. आम्ही मुस्लीम व अन्य धर्मीय आध्यात्मिक गुरूंचे प्रवचन आयोजित करू, मग त्यांनाही परवानगी देणार का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.