प्रायोगिक तत्त्वावर बिगरनिवासी भागांतच अंमलबजावणी

मुंबई : मुंबईतील रोजगारनिर्मिती, पर्यटन विकास आणि अर्थव्यवस्थेला चालना देऊ शकणाऱ्या महत्त्वाकांक्षी ‘मुंबई २४ तास’ या संकल्पनेची माहिती देत पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना विश्वासात घेतल्यानंतर या उपक्रमाला बुधवारी हिरवा कंदील मिळाला. रविवार, २६ जानेवारीच्या रात्रीपासून मुंबईत प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे, असे आदित्य ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नंतर पत्रकार परिषदेत जाहीर केले.

गेल्या आठवडय़ात मुंबई महानगरपालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्यासह आदित्य ठाकरे यांनी ‘मुंबई २४ तास’ या संकल्पनेबाबत बैठक घेतली होती. त्यानंतर २६ जानेवारीपासून हा उपक्रम सुरू होणार असल्याचे वृत्त माध्यमांत झळकले. राज्य सरकार तीन पक्षांचे असताना आणि या उपक्रमाशी गृह विभाग, अन्न व औषध प्रशासन, उत्पादन शुल्क या विविध विभागांचा संबंध असताना शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी परस्पर निर्णय घेतल्याची नाराजीची भावना राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये पसरली होती. त्यातूनच राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी याविरोधात भाष्य केले आणि निर्णय झालेला नसल्याची भूमिका घेतली. त्यानंतर पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीतील सर्व प्रस्तावांवर निर्णय झाल्यानंतर ‘मुंबई २४ तास’ या संकल्पनेची माहिती सर्व मंत्र्यांना दिली. या उपक्रमात हॉटेल्स उघडी राहणार असल्याने अन्न निरीक्षक व अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांवर अतिरिक्त ताण येईल. आधीच विभागात ३५० रिक्त पदे आहेत. त्यातील काही पदे भरावीत, अशी मागणी अन्न व औषध प्रशासनमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी केली. मुंबईत बस स्थानक, रेल्वे स्थानकांवर रात्री-अपरात्री गाडय़ा येतात. त्यातून येणाऱ्या प्रवाशांना उपयोग होईल, अशा रीतीने विचार व्हावा, अशी मागणी अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक, शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी केली.

मंत्र्यांना विश्वासात घेतल्यानंतर आदित्य ठाकरे आणि अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत या उपक्रमाची घोषणा केली. सध्या प्रायोगिक तत्त्वावर मॉल्स, गिरण्यांच्या जमिनीसारख्या बंदिस्त मोकळ्या जागा, वांद्रे-कुर्ला संकुलातील एक गल्ली, नरिमन पॉइंटमधील एक गल्ली अशा ठरावीक भागात हा उपक्रम सुरू होणार आहे. बिगरनिवासी भागातच हा उपक्रम राबवला जाईल. सुरक्षेच्या उपाययोजना, वाहनतळ, कामगार कायदे, अन्न सुरक्षा, अग्नी सुरक्षा, घनकचरा व्यवस्थापन आदी सर्व नियमांची अंमलबजावणी तिथे केली जाणार आहे, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. पुण्यात हा उपक्रम सुरू करणार का, या प्रश्नावर आधी तेथे दुपारी दुकाने उघडी ठेवावी लागतील, अशी कोपरखळी ठाकरे यांनी मारली. त्याचबरोबर या उपक्रमावर टीका करणाऱ्या विरोधकांचाही आदित्य यांनी समाचार घेतला. ज्यांची मने दूषित आहेत, त्यांना सारे तसेच दिसते, असा टोला त्यांनी लगावला.

दुकाने आणि आस्थापना कायद्यामध्ये २०१७ मध्येच सुधारणा झाली; पण त्या वेळी त्याची अंमलबजावणी झाली नाही. आता ‘मुंबई २४ तास’च्या माध्यमातून त्याची अंमलबजावणी होत आहे, असे त्यांनी सांगितले. लंडन येथील रात्रीच्या काळातील पर्यटनाची आर्थिक उलाढाल ही जवळपास पाच अब्ज पाऊंडची आहे, याकडेही आदित्य ठाकरे यांनी लक्ष वेधले.

* ‘मुंबई २४ तास’ उपक्रमामुळे व्यवसाय, उद्योग, पर्यटन आणि रोजगार वाढल्याने अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याचा आदित्य यांचा विश्वास.

* उत्पादन शुल्क कायद्यामध्ये कोणतेही बदल नाहीत. पब, बार इत्यादी सध्या प्रचलित नियमानुसार व सध्या निश्चित असलेल्या वेळेतच सुरू राहणार.

* ‘मुंबई २४ तास’मुळे विविध आस्थापने ३ पाळ्यांमध्ये सुरू राहतील. त्यामुळे रोजगारात तिप्पट वाढ होईल, असा आदित्य यांचा दावा.