विधिमंडळ अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची शक्यता धूसर असून महामंडळांच्या वाटपावरूनही शिवसेना-भाजप चर्चेचे गाडे अडलेलेच आहे. सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन काही चर्चा केल्याने राजकीय घडामोडींना वेग आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पण ठाकरे यांची टीका आणि ‘सामना’ वृत्तपत्रातील लिखाणावरुन भाजप नेते नाराज असून मुख्यमंत्री फडणवीस आणि ठाकरे यांच्या दरम्यान या मुद्दय़ांवरही चर्चा झाल्याचे समजते. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पावसाळी अधिवेशनापूर्वी होणार, असे मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी यापूर्वी सांगितले होते. पण अजूनही तशा हालचाली सुरु नसताना उत्सवांवरील र्निबधांच्या प्रश्ना निमित्ताने झालेल्या या भेटीत राजकीय चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. पण भाजपचे केंद्रीय नेतृत्व आणि मुख्यमंत्री फडणवीस विस्तारासाठी अनुकूल नसल्याने अधिवेशनानंतरच त्याबाबत विचार होण्याची शक्यता आहे.