केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारापाठोपाठ राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख निश्चित झाली आहे. येत्या ७ जुलै रोजी भाजप व मित्रपक्षातील मिळून एकुण ९ नेते मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. यामध्ये भाजपच्या ४, शिवसेनेच्या दोन आणि मित्रपक्षांच्या तीन नेत्यांचा समावेश असेल. मित्रपक्षांच्या तीन मंत्रिपदांवर महादेव जानकर, विनायक मेटे आणि सदाभाऊ खोत यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. शिवसेनेला देण्यात येणाऱ्या दोन मंत्रिपदांसाठी गुलाबराव पाटील आणि अर्जुन खोतकर यांची नावे चर्चेत आहेत. मात्र, ही खाती सध्याच्या मंत्रिमंडळातील शिवसेना नेत्यांकडील अतिरिक्त खाती असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे भाजपकडून सेनेची अतिरिक्त मंत्रिपदावर बोळवण करण्यात येणार असल्याची चर्चा खरी ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता शिवसेना काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे. याशिवाय, भाजपकडून सुरेश खाडे, शिवाजीराव नाईक , सुधाकर भालेराव, संभाजी पाटील, पांडुरंग फुंडकर, डॉ संजय कुटे, मदन येरावर, जयकुमार रावल , हरिभाऊ जावळे यांच्यापैकी चौघांना संधी मिळणार आहे.