News Flash

मेट्रो कारशेडच्या नव्या जागेची आदित्य ठाकरेंनी केली पाहणी; ट्विट करत म्हणाले…

आरेमध्ये कारशेड होऊ नये यासाठी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीही लढा दिला होता

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे कारशेडच्या जागेच्या वादावर तोडगा काढत कांजूरमार्गमधील जागेवर कारशेड उभं राहणार असल्याचं रविवारी जाहीर केलं. त्यांच्या या निर्णयावर विरोधकांकडून टीका होत आहे. दरम्यान आरेमध्ये कारशेड होऊ नये यासाठी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीही लढा दिला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात याचा उल्लेख करत आदित्य ठाकरेंचे आभार मानले होते. दरम्यान आज आदित्य ठाकरेंनी कांजूरमार्गमधील नव्या जागेची पाहणी केली. ट्विट करत त्यांनी ही माहिती दिली आहे.

आदित्य ठाकरे यांनी ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, “कारशेड उभारण्यासाठी एमएमआरडीएकडे सोपवण्यात आलेल्या जागेवर आज सकाळी मुख्यमंत्री कार्यालय, एमएमआरडीए, एमएमआरसीएल अधिकाऱ्यांसोबत भेट दिली. सुधारित योजनेसह कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी मेट्रो ३ आणि ६ ची कारशेड येथे उभारली जाणार आहे. मातीचं परीक्षण आधीच सुरु झालं आहे. जागेची पाहणी करण्यासाठी मी त्यांच्यासोबत उपस्थित होतो”.

दोन वर्षांपासून सुरू असलेल्या आरे कारशेडच्या जागेच्या वादावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी पर्यायी जागेचा तोडगा जाहीर केला. कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ची आरेतील कारशेड रद्द करून ती जागा राखीव वन जाहीर करतानाच मुख्यमंत्र्यांनी कारशेड कांजूरमार्गला उभारणार असल्याचे स्पष्ट केलं. “पर्यावरणाचा ऱ्हास करून होणारी प्रगती मान्य नसल्याचे स्पष्ट करत आरे येथील मेट्रो कारशेड कांजूरमार्ग येथील सरकारी जमिनीवर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसे आदेशही मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशनला दिल्याचे,” मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

“आरेमध्ये कारशेडसाठी बांधलेली इमारत आणि अन्य कामांवर १०० कोटी रुपये खर्च झाले आहेत. परंतु, ही इमारत इतर कारणांसाठी वापरता येईल. त्यामुळे झालेला खर्च वाया जाणार नाही,” असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. “आरेमधील ६०० एकर जागा शासनाने जंगल म्हणून राखीव ठेवण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. आता कारशेडसह परिसरातील आणखी २०० एकर जागाही वन म्हणून राखीव ठेवण्यात येणार आहे. मात्र, तेथील आदिवासी पाडे आणि तबेल्यांना हात लावणार नाही,” असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2020 1:13 pm

Web Title: maharashtra cabinet minister aditya thackeray visit kanjurmarg plot metro carshed sgy 87
Next Stories
1 धारावीत परप्रांतीय कामगारांच्या चाचण्या
2 १२ दिवसांत एसटीतील ३२९ कर्मचारी करोनाबाधित
3 आणखी एका रुग्णाचा मृत्यू
Just Now!
X