शिवसेनेकडील दोन खाती काँग्रेस, राष्ट्रवादीला?

मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांच्या खातेवाटपाचा घोळ पाचव्या दिवशीही चालूच राहिला. अधिकच्या खात्यासाठी आग्रही राहिलेल्या काँग्रेसला दोन कमी महत्त्वाची खाती देण्याची शिवसेनेने तयार दर्शविल्याचे समजते. मात्र तरीही खाते वाटप जाहीर होऊ शकले नाही.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील आघाडीच्या मंत्रिमंडळाचा ३० डिसेंबरला पूर्ण विस्तार करण्यात आला. त्या वेळी तिन्ही पक्षांच्या ३६ मंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र अद्याप त्यांना खाती मिळालेली नाहीत. काँग्रेसने काही महत्त्वाची खाती मिळावीत, असा आग्रह धरल्याने गेली चार दिवस बैठकांवर बैठका होऊनही खातेवाटपाचा घोळ मिटलेला नाही.

काँग्रेसने शिवसेनेकडील कृषी किंवा राष्ट्रवादीकडील ग्रामविकास वा सहकार खाते मिळावी, अशी मागणी केल्याने आघाडीत धुसफूस सुरु झाली. शिवसेनेने कृषी खाते सोडायला नकार दिला. राष्ट्रवादीही आपल्याकडील खाते द्यायला तयार नाही. तरीही काँग्रेस या खात्यांसाठी अडून बसल्याचे सांगण्यात येते.

गुरुवारी रात्री उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत खातेवाटपावरुन बरीच चर्चा झाली. अखेर काँग्रेसला शिवसेनेने बंदरे व खारभूमी आणि सांस्कृतिक ही दोन कमी महत्त्वाची खाती देण्याची तयारी दर्शविल्याचे समजते. त्यावर तडजोड करण्याची भूमिका काँग्रेसने घेतल्याचे सांगितले जाते. शिवसेनेकडील कमी महत्त्वाची दोन खाती राष्ट्रवादीलाही मिळण्याची शक्यता आहे. त्यानुसार उद्या खातेवाटप जाहीर होईल, असे शिवसेना व काँग्रेसमधील सूत्राकडून सांगण्यात आले.

चव्हाण-पवार यांच्यात वाद आणि इन्कार..

खातेवाटपासंदर्भात गुरुवारी रात्री सुभाष देसाई यांच्या ‘पुरातन’ या शासकीय निवास्थानी रात्री साडे अकरा वाजेपर्यंत तिन्ही पक्षांच्या मंत्र्यांची बैठक झाली. बैठकीला उद्योग मंत्री देसाई, गृह मंत्री एकनाथ शिंदे, उपमख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, अशोक चव्हाण,  बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार आदी मंत्री उपस्थित होते. काँग्रेसने अधिकच्या खात्याचा आग्रह धरल्याने त्यावरून अजित पवार व अशोक चव्हाण यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याचे समजते. अशोक चव्हाण बैठकीतून निघून गेल्याचे कळते. मात्र असा कोणत्याही प्रकारच वाद झाला नाही, आपण स्वत त्या बैठकीला उपस्थित होतो, असे काँग्रेसचे नेते व मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.