धार्मिक संस्थांकडे जमा झालेल्या निधीतून राज्यभरात सामुदायिक विवाह सोहळा राबवण्याचा अत्यंत उपयुक्त निर्णय घेणाऱ्या धर्मादाय आयुक्तांनी आता आणखी एक महत्वाचे पाऊल उचलले आहे. मुंबईतील गणेशोत्सव मंडळांनी शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचा एक चांगला निर्णय धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी घेतला आहे. धर्मादाय आयुक्तांच्या या नव्या उपक्रमास मुंबईतील काही गणेश मंडळांनी प्रतिसाद दिला असून ही गणेश मंडळं शेतकऱ्याचा भार काही प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे.

गणेशोत्सव काही महिन्यांवर आला आहे. त्या पार्श्वभूमीवर धर्मादाय आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे. बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती आणि धर्मादाय आयुक्तांच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. गणेशोत्सव मंडळांसाठी वेगळा तक्रार निवारण कक्ष उभारण्यात येणार आहे. दहावीत ८५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. यासाठी ३५ जिल्ह्यांमधून ५ ते १० विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. जमा झालेल्या रकमेनुसार प्रत्येक विद्यार्थ्याला किती मदत देता येईल, याचा निर्णय घेतला जाईल, असे सांगण्यात येते.

अनेकवेळा अभ्यासक्रमाचे शूल्क जास्त असल्यामुळे विद्यार्थ्यांना आवडीच्या शिक्षणाशी तडजोड करावी लागते. पण जर एखाद्या विद्यार्थ्याला चांगले गुण मिळाले असतील आणि त्याला हव्या त्या क्षेत्रात करिअर करायला मिळावे म्हणून ही संकल्पना राबवण्यात आली असून गणेशोत्सव मंडळे याचा भार सोसतील, असे शिवकुमार डिगे यांनी सांगितले.