मुंबईतील २६ /११ च्या दहशतवादी हल्ल्यास आज ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी पोलीस जिमखान्याच्या मैदानावर या हल्ल्यातील शहिदांना आदरांजली अर्पण केली. याप्रसंगी भाजपाचे नेते देखील उपस्थित होते. तर उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र यावेळी अनुपस्थित होते.

याशिवाय आजचा २६ नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिन म्हणून भारत सरकारकडून देशभर साजरा केला जातो. यानिमित्त संविधान गौरवाचे कार्यक्रम, संविधान गौरव सप्ताहाचे आयोजन केले जाते. यंदा २६ नोव्हेंबर ते १४ एप्रिलपर्यंत भारत सरकारतर्फे संविधान गौरव अभियान साजरे केले जाणार आहे. संविधान दिनानिमित्त आज संसदेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती वैकंय्या नायडू, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी खासदारांना संबोधित करणार आहेत. मात्र राज्यातील सत्तास्थापनेवरुन झालेल्या संघर्षानंतर शिवसेना आणि भाजपामधील संबंध ताणले गेले आहेत. सध्या महाराष्ट्रात दर दिवशी नाट्यमय घडामोडी घडत असून याचा परिणाम दिल्लीतही जाणवत आहे. एनडीएमधून बाहेर पडलेल्या शिवसेनेने संविधान दिनाच्या कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर काँग्रेसच्या नेतृत्वात काही विरोधी पक्षदेखील संविधान दिनानिमित्त आयोजित संसदेतील संयुक्त बैठकीवर बहिष्कार घालण्याची शक्यता आहे.