राज्यातील काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर नेतृत्व बदलाची मागणी पुढे आली असतानाच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे आपली बाजू मांडली. मुख्यमंत्र्यांच्या पाठोपाठ नारायण राणे यांच्यासह काही मंत्रीही दिल्ली दरबारी दाखल झाले.
मुख्यमंत्री चव्हाण यांनी सोनिया आणि राहुल गांधी यांच्याशी स्वतंत्रपणे भेट घेऊन चर्चा केली. आपल्या भवितव्याचा निर्णय दिल्लीच घेईल, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी पराभवानंतर मांडली होती. आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगाई यांनी देऊ केलेला राजीनामा सोनियांनी फेटाळून लावला होता. यामुळे मुख्यमंत्री चव्हाण हे काहीसे बिनधास्त झाले. काँग्रेसच्या दृष्टीने राज्य विधानसभेच्या निवडणुका महत्त्वाच्या असल्याने पक्ष नेतृत्वाने मुख्यमंत्र्यांकडून योजण्यात येणाऱ्या उपायांची माहिती जाणून घेतली.
मुख्यमंत्रीपदाचे दावेदार नारायण राणे, डॉ. पतंगराव कदम, नितीन राऊत आदी काही मंत्रीही दिल्लीत दाखल झाले आहेत. राज्याची सत्ता कायम राखण्यासाटी  नेतृत्व बदल करण्याची मागणी मुख्यमंत्री विरोधकांकडून केली जात आहे. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीनंतर संघटनात्मक बदल केले जातील, असे पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आले.

माणिकरावांची गच्छंती?
मुख्यमंत्री समर्थकांनी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना बदलण्याची मागणी केली आहे. गेली साडेपाच वर्षे ठाकरे हे प्रदेशाध्यक्षपदी असून, प्रदेश काँग्रेसमध्ये बदल केला जावा, अशी भूमिका मांडण्यात येत आहे.