मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पहाटे सपत्नीक मुंबईतील वर्षा या शासकीय निवासस्थानी विठ्ठल पूजा केली तर हिंगोली येथील अनिल व वर्षा जाधव या दाम्पत्याने पंढपुरच्या विठ्ठल मंदिरात शासकीय महापूजा केली. अनिल आणि वर्षा जाधव यांना यंदाचा शासकीय महापूजेचा मान मिळाला होता. काही मराठा संघटनांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पंढरपुरात विठ्ठल पूजा करु देणारी नाही अशी भूमिका घेतली होती. वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारीच पंढरपुरला न जाण्याचा निर्णय जाहीर केला.

१० लाख वारकऱ्यांच्या जिवाला धोका होईल असे प्रयत्न केले जात आहेत. पोलिसांकडून तसे संदेश प्राप्त झाले. त्यात वारकऱ्यांमध्ये साप सोडणे, चेंगराचेंगरी होऊन त्यांच्या जीविताला हानी पोहोचविण्याचा कट रचला जात होता. हे अतिशय वाईट आहे. पुरोगामी महाराष्ट्राला लज्जा आणणारा हा प्रकार आहे. कारण वारकऱ्यांना धक्का जरी लागला तरी, महाराष्ट्राला कधी कोणी माफ करणार नाही. त्यामुळे आता माझ्या विठ्ठलाची पूजा मी माझ्या घरी करेन, असेही ते म्हणाले.

दरम्यान आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो वारकरी पंढरपुरात दाखल झाले आहेत. प्रमुख पालख्या पंढरीत दाखल झाल्या आहेत. मंदिर समितीने भाविकांना सुलभ, जलद दर्शन व्हावे याकरिता विशेष व्यवस्था केली आहे. भाविकांना पाणी, चहा तसेच यंदाच्या वर्षी वैद्यकीय सेवादेखील मोफत पुरवल्या जात आहेत. शहरात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच एस. टी. महामंडळाने यंदाच्या वर्षी चार ठिकाणी तात्पुरते बसस्थानक उभे केले आहेत. दरम्यान, यंदा राज्यात सर्वदूर पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची कामे उरकून पंढरीच्या वारीला येणे पसंत केले आहे. त्यामुळे यंदाची वारी विक्रमी होईल असा अंदाज प्रशासनाला आहे. असे असले तरी भाविकांना सावळ्या विठुरायाचे लोभस रूप डोळ्यात साठवण्यासाठी आता ओढ लागली आहे.