राज्यातील जनतेची कामे तातडीने व्हावीत यासाठी सेवा हमी योजना विधेयक आणणार असल्याचे आश्वासन नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी शपथविधीनंतर झालेल्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेत दिले.
राज्यात सेवा योग्य मिळत नाहीत हा जनतेचा पहिला रोष आहे. त्यामुळे योग्य सेवा मिळण्याचा अधिकार प्रत्यकाला असावा आणि निर्धारित वेळेत प्रत्येकाला हव्या असलेल्या सेवेचा लाभ घेता यावा यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून सेवा हमी विधेयक आणणार असल्याचे फडणवीस यावेळी म्हणाले. त्यानुसार प्रत्येक विभागाला कोणत्या सेवा दिल्या जातात, किती दिवसात देतात, सेवा वेळेवर मिळाली की नाही या मुद्द्यांना अनुसरून यादी तयार करण्यात येणार असून सेवा हमी विधेयक आम्ही आणू, असे फडणवीस म्हणाले. शासनाच्या कामात पारदर्शकता आणि कार्यक्षमता आणण्यासाठीही हे विधेयक कामी येईल, असेही ते पुढे म्हणाले.
गेल्या पंधरा वर्षांची आघाडी सरकारमुळे विस्कटलेली घडी बसविण्याकरता थोडा वेळ लागेल पण, कोणतीही गोष्ट अशक्य नाही. आम्ही निश्चितपणे महाराष्ट्राला नंबर एकवर आणू असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला. तसेच आघाडी सरकारने जाता जाता दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी तब्बल ५२ हजार कोटींचे कर्ज घ्यावे लागणार असल्याची माहीती मिळाली असल्याचेही फडणवीस यावेळी म्हणाले. राज्याची आर्थिक स्थिती चांगली नसल्याची कल्पना आहे. आर्थिक दृष्ट्या राज्याला बळकट करण्यासाठी आम्ही कार्यक्षम प्रयत्न करु, असेही ते म्हणाले.
आमच्या सरकारचा पुढील १०० दिवसांचा अजेंडा जाहीर करण्यापेक्षा पहिले १०० दिवस अभ्यास करून पुढील पाच वर्षांचे नियोजन करण्याची कल्पना यावेळी फडणवीस यांनी मांडली.