मराठा आरक्षण हा महाराष्ट्रात चर्चेचा विषय आहे. आठवड्याभरापासून मराठा समाजाचे आंदोलन सुरू आहे. तसेच लवकरात लवकर मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली लावावा अशीही आग्रही मागणी होते आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, एमआयएम या पक्षाचे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी होणार आहेत. मराठा आरक्षणावर या सगळ्यांची काय भूमिका आहे हे जाणून घेतले जाणार आहे. तसेच या बैठकीत या प्रश्नावर काय तोडगा काढता येईल याचीही चर्चा केली जाणार आहे. काकासाहेब शिंदे या तरूणाचा नदीत पडून मृत्यू झाला. त्यानंतर मराठा समाजाच्या आरक्षणासाठीच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्याच पार्श्वभूमीवर हा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलावली आहे. विधान भवनात ही बैठक दुपारी २ वाजता होणार असल्याचीही माहिती समोर आली आहे.

राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजासंबंधीचा अहवाल लवकरात लवकर सादर करावा यासाठीही प्रयत्न होताना दिसत आहेत. शुक्रवारी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षण मंत्री विनोद तावडे, बबनराव लोणीकर, आमदार आशिष शेलार यांनी आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती म.जी. गायकवाड यांची या संदर्भात भेट घेतली आणि आपले निवेदनही दिले. आयोगाकडे मराठा आरक्षणासंदर्भात १ लाख ८७ हजार निवेदने आली आहेत. सर्व बाबींचा अभ्यास करून अहवाल लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करू असे गायकवाड यांनी सांगितल्याचे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी आज विधानभवनात विधानसभा आणि विधानपरिषदेच्या सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक घेण्यात येणार आहे. सभापती, अध्यक्ष यांच्यासहित सर्व गटनेत्यांची बैठक पार पडणार आहे. वेगवेगळ्या संघटना या आंदोलनात कार्यरत आहेत त्यांच्याशीही मुख्यमंत्री संवाद साधणार आहेत. त्या सर्वांना चर्चेसाठी बोलवण्यात येणार असून तोडगा काढण्याचा प्रयत्न असेल अशीही माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली. मराठा समाज आपल्या आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाला आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत नेमके काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.