लोकसत्ताच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ‘खुर्चीपलीकडील मुख्यमंत्री’ उलगडले; पितांबरी प्रस्तुत ‘लोकसत्ता वर्षवेध’चेही प्रकाशन

संध्याकाळच्या वेळी अस्ताला जाणारा सूर्य.. पश्चिमरंगी आभाळ आणि थंडगार वारा.. यांच्या जोडीला लौकिक मोठेपणा बाजूला सारून मनमोकळ्या गप्पा मारणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.. त्यांना बोलते करणाऱ्या जीतेंद्र जोशी यांचे खुसखुशीत प्रश्न.. देवेंद्र फडणवीस यांच्या आयुष्यातील अनेक गमतीदार किस्से.. त्यांचा वऱ्हाडी मोकळेपणा.. आणि या गप्पा ऐकण्यासाठी जमलेले विविध क्षेत्रांतील मान्यवर.. या अशा दिलखुलास वातावरणात मंगळवारी संध्याकाळी ‘लोकसत्ता’च्या ६८व्या वर्धापन दिनाचा सोहळा मोठय़ा दिमाखात पार पडला. या निमित्ताने पितांबरी प्रस्तुत ‘लोकसत्ता वर्षवेध’ या वार्षिक अंकाचे प्रकाशनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

‘लोकसत्ता’च्या प्रथेप्रमाणे या ६८व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातही सर्वपक्षीय राजकीय नेते, विविध क्षेत्रांतील मान्यवर, बडे अधिकारी, कलाकार, उद्योजक आदी सर्वानी आवर्जून सहभाग घेतला. ‘लोकसत्ता’चे माजी संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार अरूण टिकेकर यांना श्रद्धांजली अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली.

मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीपलीकडचे देवेंद्र फडणवीस कसे आहेत, हे जाणून घेण्यासाठी अभिनेते जीतेंद्र जोशी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली.

मुलाखतीच्या सुरुवातीलाच फडणवीस यांना त्यांच्या बालपणात घेऊन जात त्या वेळी त्यांनी केलेल्या काही खोडय़ाही त्यांच्याकडूनच वदवून घेतल्या. बालपणी आपण शांत होतो. खोडय़ा केल्या नाहीत, असा दावा आपण करणार नाही. पण कधीच पकडले गेलो नाही, अशी कबुली देत फडणवीस यांनी आपल्या मिस्कीलपणाची चुणूक दाखवली. आमदार असलेले वडील, त्यांचा दांडगा जनसंपर्क, त्यांच्याकडून नकळत मिळालेली शिकवण, आईचे मोठेपण अशा अनेक गोष्टींतून त्यांचे बालपण उलगडत गेले.

महाविद्यालयीन जीवनातील वक्तृत्व व वादविवाद स्पर्धाबाबतची आठवण सांगताना फडणवीस यांनी पहिल्या स्पर्धेतील आपल्या फजितीचा किस्साही सांगितला. त्यानंतर केलेली वक्तृत्वाची तयारी, प्रमोद महाजन व अटलबिहारी वाजपेयी यांच्या भाषणांची छाप, पहिल्यांदा केलेली राजकीय कविता, महाविद्यालयांतील निवडणुकांदरम्यानचेही खेळीमेळीचे वातावरण, महाविद्यालयाबाहेरील समोसेवाल्याकडील ‘महाविद्यालयीन जीवनदत्त’ उधारी अशा अनेक गोष्टींचा पटही त्यांनी उलगडला.

वेगाने गाडी चालवण्याच्या आवडीबद्दल बोलतानाही फडणवीस यांनी एक धमाल किस्सा सांगितला. कोणतीही पूर्वसूचना न देता एका मित्राला नागपूरहून कटकला घेऊन गेल्याची आठवण ऐकून उपस्थितांमध्ये हास्याची एकच लकेर उमटली. आजही अधूनमधून गाडी चालवत असलो, तरी पूर्वीसारखा नागपूर-मुंबई प्रवास उघडय़ा जीपमधून करता येत नसल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली. त्याचप्रमाणे आपल्याला दोन हजारांहून अधिक गाणी पाठ असली, तरी त्यातील एकही गाणे आपण सुरात गाऊ शकत नसल्याची कबुलीही त्यांनी मुक्तपणे दिली.

आपल्या स्वभावाबद्दल बोलतानाही फडणवीस यांनी राजकारणात शांत राहणे हा मोठा सद्गुण असल्याचे सांगितले. काय बोलायचे, याहीपेक्षा काय बोलू नये, हे महत्त्वाचे असते. त्याचप्रमाणे आक्रमकता गरजेची असते, आक्रस्ताळेपणा नाही, असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या शेवटी ‘जीना इसीका नाम हैं..’ या गाण्याच्या काही ओळी गुणगुणत आपल्या ‘आवाजा’चीही चुणूक दाखवली. खानपानाची व्यवस्था ‘मोशेज् फाइन फूड्स’चे मुख्य बल्लवाचार्य जितू यांच्या देखरेखीखाली पार पडली.

loksatta-in