मुंबईतील अंधेरी भागात असलेल्या कामगार रूग्णालयाला लागलेल्या आगीत 9 जणांचा मृत्यू झाला. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. या संदर्भात मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्याशीही बोललो आहे असेही मुख्यमंत्र्यांनी एएऩआय या वृत्तसंस्थेला सांगितले. आगीत ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. जे जखमी आहेत त्यांनी लवकरात लवकर बरं वाटावं यासाठी डॉक्टर्स प्रयत्न करत आहेत असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

मुंबईतील अंधेरी भागात असलेल्या कामगार रूग्णलयाला सोमवारी संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीत सुरुवातीला एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर ज्या रूग्णांना विविध रूग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले त्यांच्यापैकी गंभीर रूग्णही दगावले. आत्तापर्यंत मृतांचा आकडा 9 वर पोहचला आहे.

अंधेरीतील कामगार रूग्णालयाला आग लागल्याचे कळताच अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तिथे धाव घेतली. शिडी लावून अनेक रूग्णांना वाचवण्यात आले. आगीमुळे धुरात अनेक रूग्ण गुदमरले, त्याचमुळे मृत आणि जखमींचा आकडा वाढला असेही समजले आहे.