मुंबई : राज्यातील पूरस्थितीमुळे अल्पविराम मिळालेली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा २१ ऑगस्टपासून नंदुरबार येथून पुन्हा सुरू होणार असून ३१ ऑगस्टला या दुसऱ्या टप्प्याचा समारोप सोलापुरात होईल. गणेशोत्सव संपल्यानंतर तिसऱ्या टप्प्यातील यात्रा सुरू करण्याचा भाजपचा विचार असून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मान्यतेनंतर त्याचे तपशील निश्चित करण्यात येतील.

महाजनादेश यात्रेचा पहिला टप्पा १ ऑगस्ट ते ९ ऑगस्ट असा निश्चित करण्यात आला होता. अमरावतीमध्ये गुरुकुंज मोझरी येथून सुरू झालेल्या महाजनादेश यात्रेचा पहिला टप्पा ९ ऑगस्टला नंदुरबारमध्ये संपणार होता. मात्र कोल्हापूर-सांगलीत पूर आल्याने शेवटचे तीन दिवस यात्रेला अल्पविराम देण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईत परतले. आता पूर ओसरत असल्याने परिस्थिती नियंत्रणात येत आहे. त्यामुळे महाजनादेश यात्रा पुन्हा सुरू होणार आहे.

या यात्रेचा दुसरा टप्पा १७ ऑगस्टला सुरू होणार होता. मात्र, पूरस्थितीमुळे तो पुढे ढकलण्यात आला. २१ ऑगस्टला नंदुरबारमधून दुसऱ्या टप्प्यातील यात्रा सुरू होईल. उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर, विदर्भातील बुलडाणासह मराठवाडय़ातील सर्व जिल्हे व नंतर ३१ ऑगस्टला सोलापूरला समारोप असे दुसऱ्या टप्प्यातील यात्रेचे नियोजन आहे. १४ जिल्हे व ५५ विधानसभा मतदारसंघांतून एकूण १८३९ किलोमीटरचा प्रवास या कालावधीत होईल, अशी माहिती महाजनादेश यात्रेचे प्रमुख व भाजपचे सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी दिली.

पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे व कोकणातील जिल्ह्य़ांतून तिसऱ्या टप्प्यात यात्रा जाईल. पण तो टप्पा गणेशोत्सवानंतर सुरू करण्याचा विचार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंजुरीनंतर त्याचे वेळापत्रक व मार्ग निश्चित करण्यात येईल, असे ठाकूर यांनी स्पष्ट केले.