News Flash

भांडुपमधील रुग्णालयाच्या आगीची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी; कारवाईचा इशारा देत म्हणाले…

करोना संकटात देण्यात आली होती रुग्णालय सुरु करण्याची परवानगी

भांडुपमधील ड्रीम्स मॉल सनराइज रुग्णालयात लागलेल्या आगीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दखल घेतली आहे. उद्धव ठाकरे यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांसाठी दिलगिरी व्यक्त करत मदत केली जाईल असं आश्वासन दिलं आहे. महत्वाचं म्हणजे करोना संकटामुळे मॉलला तात्पुरत्या स्वरुपात रुग्णालय सुरु करण्याची परवानगी देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. रुग्णालयाच्या आगीत एकूण १० जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी रुग्णालयाचा बेजबाबदारपणा समोर आला असून ही अत्यंत गंभीर घटना असल्याचं सांगत गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती दिली आहे.

मुंबई – भांडुपमध्ये रुग्णालयाला लागलेल्या आगीत १० जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरे यांनी घटनास्थळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितलं की, “काल रात्री आपण कोविडसाठी काही ठिकाणी तात्काळ आणि तात्पुरत्या पद्धतीने उपचार व्हावेत यासाठी रुग्णालयाची परवानगी दिली होती. त्यातलंच एक हे मॉलमध्ये तयार केलेलं रुग्णालय होतं. आपण राज्यभर जिथे शक्य असेल तिथे आवश्यकतेनुसार कोविड सेंटर आणि रुग्णालयांसाठी परवानगी दिली होती. त्याचप्रमाणे हे रुग्णालय सुरु होतं. ही तात्पुरती परवानगी होती आणि ३१ तारखेला संपत होती”.

“दुर्दैवाने हॉस्पिटलच्या खाली असलेल्या ठिकाणी आग लागली आणि पसरत वर गेली. तिथे जे करानो रुग्ण दाखल होते तेथील सर्वांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता. पण काही जण व्हेटिलेटरवर होते त्यांना काढण्यास वेळ लागला. इतर रुग्णांची सुटका झाली पण त्यांची सुटका करण्यात वेळ लागला आणि त्यांचा मृत्यू झाला,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

“अशा दुर्घटना झाल्यानंतर आपण सगळे जागे होतो आणि चौकशी सुरु होते. या बाबतीतही चौकशी केली जाईल. जर याच्यात कोणाचा दोष असेल तर कायद्यानुसार कारवाई केली जाईल,” असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिलं. “जिथे अशी हॉस्पिटल्स, कोविड सेंटर आहेत त्यांचं फायर ऑडिट करा आणि अशा दुर्घटना होऊ देऊ नका अशा सूचना केल्या आहेत,” अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली.

आणखी वाचा- “मॉलमध्ये हॉस्पिटल याआधी कधीच पाहिलेलं नाही,” मुंबईतील आगीनंतर महापौरांचं वक्तव्य

“करोनाचं संकट वाढत अशून काही स्वयंसेवी संस्था, डॉक्टर यांची मदत घेणं आवश्यक होतं. रुग्णालयं आहेत अशा मॉल्सना आपण फायर ऑडिटच्या सूचना केल्या आहेत. याबद्दल पुन्हा एकदा पालिका आयुक्तांना सूचना दिल्या आहेत. जिथे जिथे हॉस्पिटल आहेत तिथे इतर संपूर्ण अस्थापनांसह संपूर्ण इमारतीचं फायर ऑडिट करणं गरजेचं असल्याचं सांगितलं आहे,” अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली.

“एकूण ७८ लोक रुग्णालयात दाखल होते. यामधील १० जणांचा मृत्यू झाला असून इतर ६८ जण इतर रुग्णालयात दाखल झाले आहेत तर काहीजण घरी गेले आहेत. ती यादी आमच्याकडे आहे. गुरुवारी येथे ८४ लोक आले होते, ज्यामध्ये ५० पुरुष आणि ३४ महिला होत्या. पाच ते सहा जणांबद्दलची माहिती आम्ही अद्याप मिळवत आहोत,” अशी माहिती यावेळी पोलिसांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 26, 2021 1:18 pm

Web Title: maharashtra cm uddhav thackeray bhandup hospital fire sgy 87
Next Stories
1 हिरेन प्रकरण: ‘त्या’ रुमालांबद्दल भाजपाचे चार प्रश्न; पुराव्यांशी पोलिसांनीच छेडछाड केल्याचा आरोप
2 सायरस मिस्त्रींना सुप्रीम कोर्टाचा दणका; टाटा ग्रुपला मोठा दिलासा
3 मनसुख हिरेन प्रकरण : डॉक्टर, पोलीस, निर्देश देणारे नेते सर्वांची चौकशी NIA ने करावी; भाजपाची मागणी
Just Now!
X