मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर आहेत. राज्यात ज्वलंत विषय बनलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासह चक्रीवादळाने झालेल्या नुकसानभरपाईसंदर्भात मदत करण्याबद्दल मुख्यमंत्री ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या भेटीवरून भाजपाने पुन्हा टीकास्त्र डागलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राष्ट्रीय जावई का म्हणू नये, असा टोला भाजपाने लगावला आहे.

मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणारा कायदा सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने रद्द केला. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापासून राज्यातील विरोधकांकडून ठाकरे सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. मराठा आरक्षण कायदा रद्द होण्याला राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप प्रमुख विरोधीपक्ष असलेल्या भाजपातील नेत्यांकडून केला जात आहे. तर दुसरीकडे छत्रपती संभाजीराजे भोसले यांनीही आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाचा एल्गार पुकारला आहे.

राज्यात घडत असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारचं शिष्टमंडळ पंतप्रधान मोदींची भेट घेत आहे. या भेटीवर भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करून टीका केली आहे. भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंचं व्यंगचित्र असलेला एक फोटो ट्विट केला आहे. “आज आलं अंगावर ढकललं केंद्रावरचा एपिसोड दिल्लीत. वसुलीत गर्क असल्यामुळे ठाकरे सरकारने आरक्षणाचा जो काही गुंता केलाय, तो सोडवा अशी विनंती पंतप्रधानांना करणार. झेपत नाही. कळत नाही. वसुलीपुढे सरकत नाही, अशी राज्य सरकारची तऱ्हा. सतत मागत राहता, यांना राष्ट्रीय जावई का म्हणू नये?,” असं म्हणत भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

फोटो आणि मागणी

ट्विट केलेल्या फोटोवर उद्धव ठाकरेंच्या व्यंगचित्रासह “उद्धव ठाकरेंना राष्ट्रीय जावई घोषित करायला हवे. सतत केंद्राने हे नाही दिले, ते नाही दिले म्हणून नाक मुरडत असतात,” अशी टीका करणारा मजकूरही आहे.

हेही वाचा- मोदी-उद्धव ठाकरे भेट : सोमवारी रात्री उशिरापर्यंत ‘वर्षा’वर सुरु होती पवारांसोबत चर्चा

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा हवाला देत राज्य सरकारकडून विरोधकांचे आरोप फेटाळून लावले जात आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अधिकार केंद्राला असल्याची भूमिका राज्य सरकार सातत्याने मांडत आहे. राज्यातील राजकारण आरक्षणाच्या मुद्द्यावर तापलेलं असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधानांची भेट घेत आहे. या भेटीत काय चर्चा होते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.