विधानसभेचे माजी विरोधी पक्ष नेते व काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज आमदारकीचा राजीनामा सोपवला आहे.  विधानसभा अध्यक्षांकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केला आहे.या अगोदरच त्यांनी विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा दिला होता.

राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बरोबर सिल्लोडचे काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार हे देखील भाजपा प्रवेशाच्या वाटेवर आहेत. मात्र आमदार सत्तारांच्या प्रवेशास भाजपा पदाधिका-यांकडूनच विरोध सुरू आहे. राधाकृष्ण विखे पाटील हे विधान भवनात राजीनामा देण्यासाठी गेले तेव्हा त्यांच्याबरोबर आमदार सत्तारांची देखील उपस्थिती होती.

आपण आज आमदारकीचा राजीना देणार असल्याची माहिती माध्यम प्रतिनिधीना देताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, माझी काँग्रेसमध्ये कोंडी होत असुन, आता माझी इथे घुसमट होत आहे. मला अनेक आमदार भेटत आहेत परंतु, त्यांनी राजीनामा द्यायचा की नाही हा त्यांचा निर्णय आहे. मी मात्र आज एकटा राजीनामा देत आहे. या अगोदर राधाकृष्ण पाटील यांच्या बंगल्यावर एक बैठक पार पडली, या बैठकीस आमदार अब्दुल सत्तार, आमदार भारत भालके, जयकुमार गोरे, माढाचे खासदार रणजीत निंबाळकर आदींची उपस्थिती होती. या बैठकीनंतरच राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपण राजीनामा देत असल्याचे सांगितले.

राधाकृष्ण विखेंच्या बंडखोरीमुळे काँग्रेसला लोकसभेत फटका बसल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. आता राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसला आणखी एक धक्का देणार असल्याचे दिसत आहे. जुनच्या पहिल्या आठवड्या राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसच्या काही आमदार, अनेक नगरसेवक व जिल्हा परिषद सदस्यांसह विखे भाजपात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. तर विखेंच्या भाजपा प्रवेशानंतर त्यांना मंत्रिमंडळात सहभागी करून घेतले जाणार का? याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. तर सिल्लोडचे आमदार यांनी याब वृत्ताला दुजोरा देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा प्रदेशाध्यक्षांशी चर्चा केल्यानंतर विखेंचा निर्णय होणार असल्याचे सांगितले आहे.